उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील ज्ञानेश्वर मंदिर परिसरातील एका अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्याच्या गच्चीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा गिरी यांना फेकून देवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस नाईक आशिष ढाकणे यास सात वर्षे कारवासाची शिक्षा ठोठावली आहे. उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन एच मखरे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. आरोपीस कारावासासह 25 हजार दंडाचीही शिक्षा सुनावली आहे़. बहुचर्चित आणि अनेक तर्कवितर्काने गाजलेल्या या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी उत्कृष्टरित्या तपास केल्याने हे प्रकरण आत्महत्याचे नसून हा एक सुनियोजीत हत्येचा प्रयत्न असल्याचे सिद्ध झाले आहे. जिल्हा सरकारी वकील अॅड. शरद जाधवर यांनी या प्रकरणी तब्बल 24 साक्षीदार तपासत बाजू मांडल्याने पीडीत महिला अधिकाऱ्याला न्याय मिळाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा रामदास गिरी या प्लस हॉस्पीटल शेजारील एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होत्या. पोलीस दलातील चालक आशिष ढाकणे यांच्याशी त्यांचे सलोख्याचे नातेसंबध होते. या नातेसंबंधांत संशयावरून पीएसआय गिरी आणि कॉन्स्टेबल ढाकणे यांच्यामध्ये कुरबुर झाल्याचे सांगण्यात येते. 30 जून 2017 रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आशिष ढाकणे हा पीएसआय गिरी यांच्या प्लॅटवर गेला़ प्लॅटवर दोघांमध्ये भांडण झाले. त्या रागातून ढाकणे याने मनिषा गिरी याना अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावरील गच्चीवरून खाली जमिनीवर फेकून दिले. यामध्ये पीएसआय गिरी गंभीर जखमी झाल्या. त्यांना अपार्टमेंटच्या जवळील पल्स हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात पीएसआय गिरी यांच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादवी कलम 309 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पीएसआय मनिषा गिरी यांचे वडील रामदास, आई आणि भाऊ यांनी मनिषा यांना ढाकणे याने संशयाच्या कारणावरून गच्चीवरून टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे जवाब पोलिसांना दिला. त्यानुसार आनंदनगर पोलीस ठाण्यात आशिष ढाकणे याच्याविरुध्द भादवी कलम 307 अन्वये गुन्हा नोंद केला होता़. याप्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी उप अधीक्षक मोतीचंद राठोड यांच्याकडे दिला होता. राठोड यांनी प्रकरणाचा प्रथमपासून तपास सुरू केला. घटनास्थळी सर्वात प्रथम पाहिलेला एक मुलगा, उपचारासाठी दाखल केलेले अन्य लोक, मनिषा गिरी, तिचे वडील, आई, भाऊ, नातेवाईक आदींचे जवाब घेतले. त्यावरून आशिष ढाकणे याच्याविरूध्द उस्मानाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
जिल्हा सरकारी वकील अॅड शरद जाधवर यांनी तब्बल 24 साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष, उप विभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी राठोड, पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सादर केलेले पुरावे, जवाब ग्राह्य धरून न्यायाधीश एन एच मकरे यांनी आरोपी आशिष ढाकणे यास भादवी कलम 307 गुन्ह्यात दोषी ठरवून 7 वर्षाची सक्त मजुरी आणि 25 हजार रुपए दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात पोलीस उप अधीक्षक मोतीचंद राठोड आणि जिल्हा शासकीय अभियोक्ता अॅड शरद जाधवर यांनी मांडलेली बाजू, सादर केलेले पुरावे, साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
तपासाचे दडपण होते. पीडीत महिला चौथ्या मजल्यावरून पडल्याने बेशुध्द अवस्थेत होती. ती गंभीर जखमी होती़. तिच्या शरीराला 27 ठिकाणी फ्रॅक्चर होवून गंभीर दुखापती झाली होती. तिला निट बोलताही येत नव्हते. फिर्यादी आणि आरोपी पोलीस प्रशासनातील असल्याने दडपण होते. परंतू, न्याय तपास करण्याच्या भूमिकेतून अत्यंत बारकाईने काम केल्याने साक्षी, पुरावे, जवाब घेवून दोषारोपपत्र करण्यात आले. त्यामुळे पीडितेला न्याय देता आला, अशी प्रतिक्रिया पोलीस उप अधीक्षक तथा तपास अधिकारी मोतीचंद राठोड यांनी दिली. पीडित आणि आरोपी हे दोघेही पोलीस दलातील असल्याने या प्रकरणात पुरावे हे काळजीपूर्वक तपासले गेले. तसेच ते न्यायालयात योग्य पद्धतीने मांडले गेले. त्यामुळे या प्रकरणात सत्य समोर आल्याची प्रतिक्रिया वकील शरद जाधवर यांनी दिली.
हेही वाचा : बागायतदाराला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, घरी बोलावलं, नंतर कथित पतीची एन्ट्री, अहमदनगरमध्ये पुन्हा हनी ट्रॅप