पुणे : पुणे शहर गुन्हेगारीचा अड्डाच बनत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पुण्यातील मोठ्या नामचिन गुंडांचे राजकीय पक्षातील नेत्यांसोबत असणारे संबंध असल्याचंही पाहायला मिळालं आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यावर पुण्यातील 277 गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावत ओळख परेड घेण्यात आली. यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध टोळ्यांचे म्होरकेसुद्ध हजर होते, यामध्ये गजा मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर यांचा समावेश होता.
पोलिसांनी सर्व गुन्हेगारांची ओळख परेड करत त्यांना तंबी दिली. सोशल मीडियाचा वापर करत दहशत पसरवू नये. त्यासोबतच हातात कोयते घेत रील्स बनवून ती शेअर करू नका, अशा सूचना पोलिसांनी सर्वांना दिल्या. पोलिसांकडून ओळख परेड सुरू असताना एका गुन्हेगाराने मिशा पिळल्या. तेव्हा चौकशी करणाऱ्या पोलिसाने ही गोष्ट हेरली. त्याला समोर बोलावलं.
गुन्हेगाराला समोर बोलावत त्यांनी काय करत होता असं विचारलं तेव्हा तो घाबरलेला दिसला. शेवटी त्याने कबुल केलं की आपण मिशा पिळल्याचं हाताने करून दाखवलं. पोलिसांनी त्यावेळी त्याला समज दिली आणि सोडून दिलं. संबंधित गुन्हेगार हा मीडियाचा कॅमेरा समोर आल्यावर मिशा पिळत होता. पोलिसांच्या नजरेपासून तो वाचू शकला नाही. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आगामी निवडणुकांमुळे कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नवीन आयुक्त अमितेश कुमारांनी आधीच सर्व गुन्हेगारांना दणका दिला. शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा सर्वांना बोलावून घेतलं. शहरात दहशत पसरवणारे सगळे गुंड हाताची घडी घालून शांतपणे पाहायला मिळाले.
दरम्यान, गेल्या महिन्यात शरद मोहोळ याच्या हत्येने आधीच गंभीर वातावरण झालं आहे. या हत्येमध्ये मोठ्या गुंडांचा समावेश असल्याने परत एकदा टोळीयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.