पुणे | 15 जानेवारी 2024 : सरकारी नोकरी मिळणे हे अनेकांसाठी स्वप्न असते. अनेक तरूण-तरूणी त्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र काही भामटे याच संधीचा फायदा घेऊन सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांची आर्थिक फसवणूक करतात. असाच एक धक्कादायक प्रकार विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात घडला आहे. पुणे महापालिका, रेल्वे आणि सरकारी बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत त्या बहाण्याने एका इसमाची तब्बल साठेआठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या आर्थिक फसवणुकी प्रकरणी शहरातील दांपत्याविरोधात चतु:र्श्रुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जहाँगिर सत्तार शेख असे फिर्यादीचे नाव असून त्यांनी चतु:र्श्रुंगी पोलिसांत धाव घेत फसवणुकीची तक्रार नोंदवली. गुरूवारी ही फिर्याद दाखल करण्यात आली. त्या फिर्यादीच्या आधारे चतु:र्श्रुंगी पोलिसांनी कामराज के घोडके व त्याची पत्नी उज्वला या दांपत्याविरोधात 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ऑगस्ट 2020 पासून आजपर्यंत सेनापती रोडवरील चंद्रलोक सोसायटीच्या समोर आणि वडारवाडी येथे फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे.
फिर्यादी जहाँगिर हे शिवाजीनगर भागात राहतात. त्यांची आरोपी घोडके यांच्याशी ओळख झाली. जहाँगिर यांची दोन मुलं आणि त्यांच्या भावाच्या मुलांना सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष घोडके दांपत्याने दाखवले. त्या चौघांना पुणे मनपा, तसेच रेल्वेमध्ये टी.सी म्हणून, सरकारी बँकेत नोकरी लावून देतो, असे आश्वासन दिले आणि पैशांची मागणी केली. ऑगस्ट 2020 पासून हा प्रकरा सुरू होता. त्यानुसार फिर्यादी जहाँगिर यांनी चेकद्वारे सहा लाख रुपये कामराज घोडके यांना दिले. आरोपी घोडके याने तो मिळालेला चेक त्याची पत्नी उज्वला हीच्या एफ.सी. रोडवरील बँक खात्यात जमा करुन पैसे घेतले.
त्यानंतर त्यांनी पुन्हा पैशांची मागणी करुन अडीच लाख रुपये रोख स्वरुपात घेतले. पण पैसे दिल्यानंतर मुलांना नोकरी काही लावली नाही. त्यामुळे फिर्यादीने त्यांच्याकडून 8 लाख 50 हजार रुपये परत मागितले. मात्र घोडके यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शेख यांनी चतु:र्श्रुंगी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत आर्थिक फसवणुकीची तक्रारन नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर अधिक तपास करत आहेत.