अभिजीत पोते , टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 16 नोव्हेंबर 2023 : संशय… हा फक्त शब्द नाही, ती एक वृत्ती आहे. एकदा संशय आला की तो फक्त मनात रहात नाही तर त्या माणसाच्या डोक्यावरही त्या संशयाचं भूत स्वार होतं आणि मग सगळंच उद्ध्वस्त होतं. संशयाच्या याच भुतामुळे पुण्यात नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. ज्यामुळे अख्खं शहर हादरलं. चारित्र्यावर संशय घेत एक इसमाने त्याच्या पत्नीला औषधांच्या गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे गिळायला लावण्याची अत्यंत क्रूर घटना घडली आहे.
पुण्यातील उत्तमनगर मध्ये हा प्रकार घडला असून 41 वर्षीय पीडित महिलेने यासंदर्भात उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे अमानुष कृत्य करणाऱ्या सोमनाथ सपकाळ ( वय 45) याला अटक केली. मात्र सुशिक्षितांचे आणि सुजाण नागरिकांचे शहर अशी ओळख मिरवणाऱ्या पुण्यातील या धक्कादायक प्रकारामुळे मोठी खळबळ माजली.
दोन महिन्यांपासून सुरू होते वाद
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा नृशंस प्रकार ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होता. गेल्या दोन महिन्यांपासून सपकाळ दाम्पत्यामध्ये अनेक वाद-विवाद सुरू होते. सोमनाथ हा अनेक वेळा त्याच्या पत्नीवर संशय घ्यायचा. त्याच मुद्यावरून त्यांच्यात अनेक वाद व्हायचे. रागाच्या भरात सोमनाथ हा त्याच्या पत्नीला शिवीगाळ करायचा, एवढेच नव्हे तर त्याने तिच्यावर हात उचलत मारहाणही केली होती. काही दिवसांपूर्चवी सोमनाथ आणि त्याचा भाऊ, घरात दारू पीत बसले होते. तेव्हाही सोमनाथ या मुद्यावरू त्याच्या पत्नीशी भांडला होता.
पत्नीची हत्या करण्याचा रचला कट
यामुळेच संतापलेल्या सोमनाथने त्याच्या पत्नीची हत्या करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने प्लानिंगही केले. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोमनाथने त्याच्या पत्नीला कॅल्शिअमच्या कॅप्सूल्स खाण्यासाठी दिल्या, मात्र त्याआधी त्या कॅप्सूल्समध्ये ब्लेडचे तुकडे टाकले. आणि त्याच गोळ्या तिला खायला दिल्या. तोंडात ब्लेडचे तुकडे तिला टोचू लागले, धारदार तुकड्यामुळे रक्तही येऊ लागले, त्यामुळे त्याच्या पत्नीने त्या गोळ्या, आणि तुकडे थुंकून टाकण्याचा प्रयत्न केला.
पण क्रूर सोमनाथने तिचे काहीच न ऐकता तिला ते तुकडे तसेच गिळायला लावले. त्यामध्ये पीडित महिलेच्या गळ्यात गंभीर जखमाही झाल्या. त्यांनी वैद्यकीय तपासणी केली आणि हा सगळा प्रकार समोर आला. अखेक पीडित महिलेने नराधाम पतीविरोधात तक्रार दाखल केली आणि उत्तमनगर पोलिसांनी आरोपी सोमनथ याला अटक करत तुरूंगात टाकले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.