विद्येचे माहेरघर असलेले पुणे गुन्हेगारीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पुणे शहरातील नाना पेठमधील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. 1 सप्टेंबर रविवारी रात्री नऊ वाजता आपल्या घराजवळ उभा असलेल्या वनराज आंदेकरांवर गोळीबार झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत त्यांना जागीच संपवलं. नाना पेठ डोके तालीमजवळ हा सर्व प्रकार घडला. चार-पाच दुचाकीवर आलेल्या दहा ते बारा जणांनी वनराज यांचा मर्डर केला. या घटनेमुळे परत एकदा पुण्यातील गुन्हेगारी डोके वर काढत असल्याचं दिसत आहे.
वनराज आंदेकर यांचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर कुख्यात गुंड आहे. पुण्यामधील नाना पेठेतील आंदेकर यांची टोळी प्रसिद्ध आहे, या टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर. बंडू आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. मात्र जानेवारीमध्ये तो जामीनावर बाहेर आलाय. बंडू आंदेकर याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. संपत्तीच्या वादातूनच वनराज यांची हत्या झाली. वनराज आंदेकर यांची हत्या करण्याचा प्लॅन त्यांच्याच दोन बहिणी आणि मेहुण्यांनी केला. पुण्याचे शहर आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी वनराज आंदेकर यांचे मेहुणे जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि बहिणी संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर यांना या हत्या प्रकरणात अटक केल्याची माहिती दिली आहे.
वनराज आंदेकर आणि त्यांच्या बहिणींमध्ये संपत्तीवरून वाद होता. गणेश कोमकर याला नाना पेठेमधील एक दुकान दिले गेले होते. मात्र ते दुकान महापालिकेने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडले. यावरून दोन्ही कुटूंबात वाद सुरू होता. जावई गणेश कोमकर यानेही आपली गँग तयार केली होती. आंदेकर यांच्याच नावाचा फायदा घेऊन तो गुंडगिरी करत होता. आंदेकरांच्या एका माणसासोबत त्याचं भांडण झालं होतं. या भांडणामध्ये गणेश कोमकरला मारहाण झाली होती. दुकाने पाडले गेल्याने आणि या भांडणामध्ये झालेल्या मारहाणीच्या रागातून दोन्ही कुटूंबातील तणाव वाढला होता. यादरम्यान तुला पोरं बोलवून ठोकते अशी धमकी वनराज यांना त्यांच्या बहिणीने दिली होती.
याच घरगुती संपत्तीच्या वादातून सख्या बहिणीनेच आपल्याच भावाची सुपारी दिली. जयंत कोमकर, गणेश कोमकर यांनी सोमनाथ गायकवाड याला वनराज यांची सुपारी दिल्याची माहिती समजली आहे. रविवारी संध्याकाळी आंदेकर यांच्या घरात कौटुंबिक कार्यक्रम होता, त्यानंतर ते नऊच्या सुमारास आपल्या चुलत भावासह खाली उभे राहिले होते. त्यावेळी अचानाक दुचाकीवाले त्यांच्याजवळ आले आणि गोळीबार करू लागले. जवळपास दहा ते बारा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. पाच राऊंड फायर केले त्यानंतर काहींनी आपल्या शर्टमध्ये लपवलेला कोयता बाहेर काढला आणि त्यांच्यावर वार केले.
पुणे शहरातील नाना पेठमधील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या #aandekar #punecrime #pune #viral pic.twitter.com/Ucr948nxP3
— Harish Malusare (@harish_malusare) September 2, 2024
दरम्यान, वनराज आंदेकर यांचे वडील म्हणजेच कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वनराज यांच्या दोन बहिणी आणि त्यांच्या पतींच्या सांगण्यावरून हा खून झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली असून या प्रकरणाचा पोलीस करत आहे.