पुणे | 15 सप्टेंबर 2023 : विद्येचे माहेर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये (pune crime) गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. गेल्या काही महिन्यात पुणे शहरात गुन्ह्यांची अनेक प्रकरणे घडली असून सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. पैसे मिळवण्यासाठी गुन्हेगार कोणत्याही थराला जाऊ शकतात. तशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.पैशांसाठी दोन महिलांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे शहरातून दोन महिलांचे अपहरण (kidnapping) करण्यात आले होते. व त्यांच्या सुटकेसाठी पैशांची मागणी अर्थात खंडणी मागण्यात आली होती. ती रक्कमही थोडी-थोडकी नव्हती, तर आरोपींनी खंडणी म्हणून तब्बल १७ लाख रुपये मागितले होते.
पैसे हातात येईपर्यंत महिलांना सोडण्यात येणार नाही, असा इशाराही आरोपींनी दिला होता. मात्र त्यामुळे त्या महिलांचं व कुटुंबियांचं धाबं दणाणलं होतं. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत मदतीची मागणी केली असता, पोलिसांना हुशारीने कारवाई करत अपहृत महिलांना तर सोडवलंच पण हे दुष्कृत्य करणाऱ्या आरोपींनाही अटक करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई करत आरोपींच्या हातात बेड्या ठोकल्या. पीडित महिला या सामाजिक कार्यकर्त्या आहेत असे समजते.
बाबुलाल मोहोळ (45 वर्षे), अमर मोहिते (39 वर्षे) , प्रदीप नलावडे (38 वर्षे) आणि अक्षय फड (24 वर्षे) अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून ते सराईत गुन्हेगार आहेत. अपहरणाच्या या गुन्ह्याप्रकरणी उत्तम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.
का केलं अपहरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बाबूलाल हा सराईत गुन्हेगार असून तो शरद मोहोळ टोळीतील आहे. तर ज्यांचे अपहरण करण्यात आले होते, त्या दोन महिला या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या दोघींनी बाबूलाल याच्याकडून काही रोख रक्कम घेतली होती. पुणे स्टेशन परिसरात स्टॉल मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी पैसे घेतानाच बाबूलाल याला दिले होते.
मात्र बरेच दिवस झाले तरी त्याला काही स्टॉल मिळण्याचे चिन्हे दिसेना. त्याने याप्रकरणी त्या महिलांनाही प्रश्न विचारला, मात्र त्यांनी टाळमटाळ केली. अखेर संतापलेल्या बाबूलाल याने त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि काही साथीदारांसह त्या दोनही महिलांचे अपहरण केले.
पुण्यातील कात्रज आणि वारजे या परिसरातून त्या दोघींना उचलण्यात आले व एके ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर आरोपी बाबूलाल व त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पहारा ठेवण्यास सुरूवात केली. बाबूलाल याने त्या महिलांच्या घरी फोन केला आणि महिलांची सुटका करण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केली. त्याने कुटुंबियांकडून १७ लाख रुपयांची खंडणी मागितली. आणि हे पैसे मिळाले नाहीत तर, त्या महिलांना ठार मारू, अशी धमकीही आरोपींनी त्या महिलांच्या कुटुंबियांना दिली.
अपहरण आणि खंडणीची मागणी झाल्याने अपहृत महिलांपैकी एकीचा मुलगा खूप घाबरला आणि त्याने तातडीने पुणे पोलिसांकडे धाव घेत मदतीची मागणी केली. याप्रकरणाची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी आरोपींविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला व अपहृत महिलांचा शोध घेण्यास तातडीने सुरूवात केली. तांत्रिक तपास आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, त्या महिलांना कुठे डांबून ठेवले आहे, त्याचा पोलिसांना सुगावा लागला. दोनही महिलांना उत्तम नगर या परिसरात एका आरोपीच्या घरातच डांबून ठेवण्यात आले होते. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत कारवाई केली व दोन्ही अपहृत महिलांची सुखरूप सुटका केली . एवढेच नव्हे तर त्यांनी चारही आरोपींना ताब्यात घेत त्यांना बेड्या ठोकल्या.