विधानसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र मोठ्या हत्याकांडाने हादरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वनराज आंदेकर यांची पुण्यात निर्घृण हत्या झाली असून मोठी खळबळ उडाली आहे. भर चौकात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. एवढंच नव्हे तर मारेकऱ्यांनी त्यांच्यावर कोयत्यानेही सपासप वार केले. यामुळे पुण्यात मोठी दहशत माजली असून पोलिसांनी याप्रकरणी 3 संशयित आरोपींना अटकही केली आहे. याचदरम्यान या हत्याकांडाचा सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ समोर आला असून ही हत्या नेमकी कशी झाली, तेव्हा तिकडे काय घडलं, कोण-कोण उपस्थित होतं याचा खळबळजनक तपशीलही समोर आला आहे.
नेमकं काय घडलं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराची ही घटना नाना पेठ भागात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज हे रविवारी रात्री 8.30 सुमारास तेथे उभे असताना अचानक बाईकवरून काही हल्लेखोर आले आणि त्यांनी वनराज यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यांनी वनराज यांच्यावर पाच राऊंड फायर केले. एवढेच नव्हे तर ते खाली कोसळल्यावरही हल्लेखोर थांबले नाहीत,त्यांनी वनराज यांच्या शरीरावर कोयत्यानेही सपासप वार केले. काही क्षणात आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले, ते पाहून आरोपींनी तेथून लागलीच पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हल्लेखोरांनी धडाधड मारल्या गोळ्या
या घटनेनंतर नाना पेठ परिसरात अतिशय दहशतीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पेठेतील डोके तालीम येथील ही घटना आहे. ही वर्दळीची जागा आहे. पण काल हल्ल्यापूर्वीच या भागातील वीज घालवून अंधार करण्यात आला. सीसीटीव्हीमध्ये ते दिसून आलं. त्यानंतर आंदेकर उभे होते तेथे 5-6 बाईक्सवर बसून 12-13 हल्लेखोर आले, गाडीवरून पटापट उड्या मारून त्यांनी आंदेकरांवर नेम धरून बंदूकीतन सटासट गोळ्या झाडल्या.
Former NCP corporator #VanrajAndekar shot dead in Pune.#CCTV#Pune #NCP #Maharashtra pic.twitter.com/CY04vJ1LOG
— Indrajeet chaubey (@indrajeet8080) September 2, 2024
त्यांना पाहून आंदेकर व त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या एकाने पळ काढण्याचाही प्रयत्न केला. पण एका हल्लेखोराने त्यांचा टीशर्ट पकडून त्यांना ओढलं आणि गोळ्या चालवल्या, त्यानंतर त्यांच्यावर कोयत्यानेही सपासप वार केले. काही क्षणांतच हल्लेखोर बाहेर पडले, एक-दोघांच्या हातात कोयता तळपत होता.पटापट ते बाईक्सवर बसले आणि पुढच्याच क्षणी त्यांनी घटनास्थळवारून पळ काढला.
आंदेकर कुटुंबाचा राजकारणात दबदबा
पुणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये वनराज आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वनराज आंदेकर यांच्या आई राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 च्या महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेविका होत्या. त्यासोबतच वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक होते.
घरगुती कारणामुळे हत्या ?
वनराज आंदेकर यांची हत्या करणारा संशियत आरोपी गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचा जावई आहे. त्यामुळे आंदेकरांची हत्या घरगुती कारणामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. हत्येमागचे नेमके कारण काय, त्यात कोण-कोण सामील आहे, या सर्व गोष्टींचा पोलिसांचे पथक कसून तपास करत आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या चौकशीतून बरीच माहिती समोर येऊ शकते.