पुणे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड वाढत चाललं आहे. कधी चोरी, तर कधी दरोडा यामुळे पुणेकरांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. पुण्यात गुन्हेगारांचा सर्रास वावर सुरू असून, त्यांना खाकी वर्दीची काही भीतीच नसल्याचे चित्र दिसत आहे. पिझ्झा मिळाला नाही म्हणून हॉटेल चालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यात आणखी एक खळबळजक प्रकार घडला आहे.
पुण्यात एका तरूणावर काही तरूणांनी धारदार शस्त्राने वार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एवढंच नव्हे तर या हल्ल्यानंतर दहशत निर्माण करण्यासाठी त्या हल्लेखोरांनी रील तयार केलं आणि ते सोशल मीडियावर व्हायरलही केलं. यामुळे शहरात भीतीचं वातावरण असून नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत.
एकट्याला गाठून केले वार
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या वाघोलीतील बकोरी फाट्यावरील जय महाराष्ट्र खाऊ गल्लीत रविवारी रात्री हा प्रकार घडला. तेथे चौघांनी एका तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. प्रमोद देशमुख असे जखमी तरूणाचे नाव आहे. तर हल्लेखोरांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.
प्रमोदवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्यात तो गंभीर जखमी झाला. मात्र हल्ल्यानंतर तरूण तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्या मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे या घटनेमधील चारही आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस अधिक तपास करत आहेत.
पिझ्झावरून हॉटेल मालकाला मारहाण
काही दिवसांपूर्वीच पिझ्झावरून काही तरूणांनी हॉटेल मालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. पुणे येथील खराडी भागातील एका हॉटेलमध्ये रात्री दीड वाजता अक्षय पाचारणे, अमोल सातव, प्रीतम कुलकर्णी, विशाल सातव गेले. त्यांनी त्या ठिकाणी पिझ्झा देण्याची मागणी केली. परंतु हॉटेलचा मालक हॉटेल बंद करुन निघाला होता. त्यानंतर हे चौघांनी मागणी लावून धरली. परंतु हॉटेल मालकाने स्पष्ट नकार दिला. त्याचा राग मनात धरून थेट हॉटेल मालकाला मारहाण केली. हॉटेलचालकाला दगडाने मारहाण केल्यामुळे तो जखमी झाला. या प्रकरणी चौघं आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.