पुणे : आळंदी जवळील चऱ्होली बुद्रुक येथे मित्राची हत्या करून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याची घटना उजेडात आली आहे. हा सर्व खटाटोप प्रेयसीसोबत पळून जाण्यासाठी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सुभाष थोरवे असे 58 वर्षीय आरोपी प्रियकराचे नाव आहे. तर रविंद्र घेनंद अस हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे. सुभाषच्या कुटुंबाने त्याचा अपघातात मृत्यू झाला असं समजून दशक्रिया विधी घातला.
सुभाष हा प्रेयसीसोबत जेजुरीत पळून गेला होता. स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून मित्राची हत्या केल्याची माहिती प्रेयसीला देण्यात आली. त्यामुळं घाबरलेली प्रेयसीने घरी जाण्याचा तगादा लावला.
सोबत असलेले पैसे संपल्याने तो अत्यंत बिकट अवस्थेत होता. तो चुलत बहिणीकडे पायी जात असताना त्याला चोर समजून तेथील स्थानिक नागरिकांनी मारहाण देखील केली.
सुभाष थोरवेने स्वतः नाव सांगताच नागरिकांनी चुलत बहिणीला बोलावलं आणि सुभाषला बघताच बहीण बेशुद्ध पडली. स्थानिकांनी आळंदी पोलिसांना बोलावून सुभाषला ताब्यात दिलं आणि स्वतःच्या मृत्यूचा बनाव केल्याचं बिंग फुटलं.
16 डिसेंबर रोजी रविंद्र आणि सुभाष धानोरीमध्ये एका क्रिकेट मॅचमध्ये भेटले. यावेळी सुभाषने रविंद्रला त्याच्यासोबत चऱ्होलीला एका शेतात येण्यास सांगितले. शेतात जात असतानाच थोरवेने घेनंदला दारु खरेदी करण्यास पैसे दिले. घेनंद दारुच्या नशेत होता.
रात्री 9 वाजेपर्यंत दोघे शेतात काम करत होते. यानंतर थोरवेने गवत कापण्याच्या मशिनने घेनंदचे शीर धडापासून वेगळे केले. त्यानंतर स्वतःचे कपडे त्याला घातले आणि दुर्घटनेत आपला मृत्यू झाल्याचे भासवण्यासाठी मृतदेह रोटावेटरजवळ फेकला.