बारामती : प्रेमप्रकरणातील जुन्या वादा (Old Dispute)तून एका व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरात घडली आहे. शशिकांत कारंडे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बारामती शहरातील श्रीरामनगर येथील कविवर्य मोरोपंत शाळेच्या आवारात आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारंडे हे मुलीला शाळेतून आणण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला (Attack) करण्यात आला. याप्रकरणी बारामती शहर पोलिसात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींची नावेही निष्पन्न झाल्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वी शशिकांत कारंडे यांचा मुलगा शेखर याच्यावरही तिघांनी हल्ला केला होता. शेखर हा प्रेम प्रकरणात अडथळा आणत असल्याच्या संशयातून हा हल्ला झाला होता. त्यातूनच आज शेखरच्या वडिलांवर हल्ला करून त्यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे बारामती शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून यात कोयत्याने वार करताना हल्लेखोर दिसत आहेत.
मयत शशिकांत यांचा मुलगा शेखर कारंडे काही महिन्यांपूर्वी या हल्ल्यातील मुख्य आरोपीच्या प्रेयसीसोबत बोलत असताना आरोपीने पाहिले. यामुळे शेखरचे गर्लफ्रेंडच्या आणि आपल्या मध्ये येतोय असा संशय आरोपीच्या मनात निर्माण झाला. याच संशयातून त्याने काही महिन्यांपूर्वी आपल्या दोन मित्रांसोबत मिळून शेखरवर हल्ला केला होता. मात्र शेखर यातून बचावला. आरोपीच्या मनात मात्र खुन्नस होती. शेखर बचावल्यामुळे आरोपींनी त्याच्या वडिलांवर आज हल्ला केला. या हल्ल्यात शेखरचे वडिल शशिकांत कारंडे यांचा मृत्यू झाला.
बारामती शहरातील श्रीरामनगरमध्ये शशिकांत कारंडे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी कविवर्य मोरोपंत शाळेत शिकत असून, आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मुलीला आणण्यासाठी शाळेत गेले होते. यावेळी कारंडे यांच्या पाळतीवर असलेल्या तिघा हल्लेखोरांनी त्यांच्याकडील कोयत्याने कारंडे यांच्यावर वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कारंडे यांना बारामती येथील महिला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. (A man was killed in Baramati due to an old love dispute)