पुणे : माकडांना खायला घालताना सेल्फी घेणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. वरंधा घाटात सेल्फी घेताना एक व्यक्ती 400 फूट खोल दरीत पडला. भोर आणि महाडमधील रेस्क्यू टीम मदतीसाठी घटनास्थळी रवाना झाली आहे. सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकली नाही. मात्र घटनास्थळी संबंधित व्यक्तीची लाल रंगाची कार आढळून आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
सदर व्यक्ती पुणे-महाड मार्गावरील वरंध घाटातून आपल्या कारने चालला होता. घाटातील वाघजाई मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला त्याने गाडी थांबवली आणि माकडांना खायला द्यायला तो खाली उतरला.
माकडांना खायला देताना सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असतानाच तोल जाऊन तो 400 फूट दरीत खाली कोसळला. दरीत एक व्यक्ती पडल्याची माहिती स्थानिक लोकांनी तात्काळ पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच भोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. दरीत पडलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी भोर आणि महाड येथील रेस्क्यू टीम मदतीसाठी रवाना झाल्या आहेत.
सदर व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलीस व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान रेस्क्यू टीमकडून व्यक्तीचा शोध सुरु आहे. मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही.