सुनिल थिगळे, TV9 मराठी, चाकण : जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी एका रिक्षा चालकाची निर्घृण हत्या (Auto Driver Murder) केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील चाकण (Chakan Pune) येथे घडली आहे. युसुफ अर्षद काकर असे हत्या करण्यात आलेल्या 18 वर्षीय रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणाच्या भावाच्या तक्रारीनुसार चाकण पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.
प्रणव ऊर्फ पन्या संजय शिंदे, साहिल दत्ताशिंदे, आनंदा ऊर्फ अण्णा तांडव, हनुमंत कोरमशेट्टी, निशान देवेंद्र बोगाती, अतुल अर्जुन तांबे, रितेश परमेश्वर घोडके, यश अनिल जगताप, कुलदिप जोगदंड, कृष्णा सुनिल भंडलकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मयत युसूफ हा दुपारच्या सुमारास घरी जेवायला चालला होता. यावेळी आरोपीपैकी एकाने युसूफच्या रिक्षाला हात दाखवला आणि वाकी जवळ जाऊन पुन्हा यायचे आहे असे सांगितले. युसूफने हे भाडे स्वीकारले आणि रिक्षा वाकीच्या दिशेने घेऊन निघाला.
रिक्षा चाकण-रोहकल रस्त्याच्या असलेल्या बैलगाडा घाटाजवळ येताच त्या ठिकाणी आधीच दबा धरुन बसलेल्या आरोपींनी युसुफच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्याने युसुफ घाबरुन रिक्षा सोडून पळू लागला.
मात्र डोळ्यात मिरची पूड गेल्याने त्याला पुढे काही दिसत नसल्याने तो अधिक पळू शकला नाही. याचा फायदा घेत हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्याला गाठले आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात युसुफचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळावरून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि लाल मिरची पावडर जप्त केली आहे.
पूर्व वैमनस्यातून रोहित सहानी या तरुणाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेने चाकण परिसरात खळबळ माजली आहे.
चाकण परिसरात दिवसेंदिवस खुनाच्या घटनांमध्ये मोठ्या संख्येनं वाढ होत आहे. अनेक गुन्हे चाकण परिसरात घडत असल्याने ही गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान चाकण पोलिसांसमोर उभे आहे.