पुणे : सांस्कृतिक शहर आणि विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारी काही कमी नावच घेताना दिसत नाही. भिकारी बनून आलेल्या दोन महिलांनी एका बंगल्यातून 200 तोळे सोन्याची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरी केलेल्या सोन्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे. पुण्यातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या पाषाण येथील सिंध सोसायटीमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी दोन महिला, एक पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. खुशबू गुप्ता, अनु आव्हाड, महावीर चपलोत, मदन वैष्णव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना जालना आणि बीडमधून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पाषाण भागात असणाऱ्या सिंध सोसायटीमध्ये दयाल यांचा बंगला आहे. चोरी करणाऱ्या महिला या बीड तसेच जालना या जिल्ह्यातील असून, या बंगल्याबाहेर त्यांनी अनेक वेळा येऊन भिकारी असल्याचं बनाव रचला होता.
अनेक वेळा या महिला अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन या बंगल्यात भीक मागण्यासाठी जात असत. यावेळी गरीब असल्यामुळे बंगल्यातील काहीजण त्यांना अनेक वेळा दुपारी खाणं-पिण द्यायचे. याच गोष्टीचा फायदा घेत या महिलांनी या बंगल्याची रेकी केली.
घरातील सगळेजण बाहेर कधी जातात आणि कधी परततात याची माहिती या महिलांनी जमवली होती. त्यानुसार 11 डिसेंबर रोजी या महिलांनी घरात कोणी नसताना घराच्या मागील बाजूने आत प्रवेश केला. यानंतर बेडरूममध्ये असलेले लॉकर तोडून त्यातील दागिने आणि इतर वस्तू घेऊन पळून गेल्या.