पुणे : ऑनलाईन हॉटेल बुक करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. हॉटेल बुक करण्याच्या नादात सायबर चोरट्यांनी व्यक्तीला एक लाख रुपयांना गंडा घातला आहे. रोहिदास मोरे असे फसवणूक झालेल्या 74 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबत पुढील तपास करत असून, आरोपीचा शोध घेत आहेत.
रोहिदास मोरे यांना डिसेंबरमध्ये महाबळेश्वरला फिरण्यासाठी जायचे होते. यासाठी ते सप्टेंबर महिन्यात महाबळेश्वरमधील हॉटेल बुकिंग करत होते. हॉटेल बुकिंगसाठी त्यांनी ऑनलाईन पर्याय निवडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे यांनी सप्टेंबर महिन्यात “द किज एवरशाईन रिसॉर्ट” या महाबळेश्वरमध्ये असलेल्या नामांकित हॉटेलच्या बुकिंगसाठी ऑनलाईन मार्ग निवडला होता. यासाठी त्यांनी एका वेबसाईटशी संपर्क साधला.
या वेबसाईटवर त्यांना एक मोबाईल नंबर देत त्या नंबरवर तुमचे बुकिंग केले जाईल असे सांगण्यात आले. या मोबाईल नंबरवर मोरे यांनी संपर्क देखील झाला आणि डिसेंबरमध्ये हवं असलेल्या रिसॉर्टच्या बुकिंगसाठी अॅडव्हान्स पेमेंट करा असे सांगितले.
या मोबाईल धारकाने मोरे यांचा विश्वास संपादन करून व्हॉट्सॲपवर कुठल्या बँकेत पैसे पाठवायचे सांगितले. त्यानुसार मोरे यांनी या मोबाईल नंबरवर 1 लाख रुपये पाठवले. मात्र त्यानंतर त्यांना कुठलाच फोन आला नाही.
इतकंच काय मोरे यांनी महाबळेश्वरमध्ये जाऊन विचारले असता असे कुठले ही बुकिंग नसून तो मोबाईल नंबर देखील आमचा नाही असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता मोरे यांनी पोलिसात धाव घेतली.
पोलिसांच्या तपासादरम्यान हा मोबाईल नंबर उत्तर प्रदेशातील असल्याचे आढळून आले. या अज्ञात मोबाईलधारकावर फसवणुकीचा गुन्हा अलंकार पोलीस ठाण्यात दाखल असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.