पुणे : फटाके लावण्याच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना पुण्यातील लोणीकंद परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. चिराग तिवारी, सागर जावळे, अमीन शेख अशी अटक करण्यात आलेल्यांपैकी तिघांची नावे आहेत. तर अन्य दोघांची नावं अद्याप कळू शकली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात फिर्यादी आणि आरोपी हे अनेक वर्षांपासून शेजारी राहायला असल्याने एकमेकांना ओळखतात. या दोघांमध्ये फटाके लावण्यासाठी जागेवरून वाद झाले.
फटाके आमच्या दारात नको लावू यावरुन दोन्ही बाजूने खडाजंगी झाली. याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्या साथीदारासह फिर्यादी यांच्या घरात जाऊन पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांचे नुकसान केले. तसेच घरात असणाऱ्या कुटुंबातील काही सदस्यांना विटा, लाकडी दांडक्याने मारहाण देखील केली.
याप्रकरणी आरोपींवर भारतीय दंडात्मक कलम अंतर्गत तसेच भारतीय शस्त्र कायदा कलम 4(25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1), (3) अनुषंगे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरी लोणीकंद पोलीस अधिक तपास करत आहेत.
हातात हत्यार घेत दिवसा ढवळ्या नागरिकांना धमक्या देऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली आहे. मोसिन अन्वर खान असं या सराईत गुन्हेगारचं नाव असून, तो याधी तडीपार देखील होता.
मोसीन आता परिसरात दहशत माजवण्यासाठी दिवसाढवळ्या हत्यार हातात घेऊन खंडणी मागणे, नागरिकांना धमकावणे असे प्रकार दररोज करत आहे. पोलिसांचे मात्र या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.