मुंबई : पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले सीबीआय कोठडीत जाणार की दिलासा मिळणार? याचा निर्णय आज होणार आहे. सीबीआय कोर्ट याबाबत आज निकाल देईल. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. पुण्याचे व्यवसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांना सीबीआयने (CBI)अटक केली होती.येस बँक-डीएचएफएल (YES bank-DHFL) फसवणूक प्रकरणी त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात अविनाश भोसले यांच्या सीबीआय रिमांडवर दोन्ही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली आहे.मात्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून आज दुपारी बाराच्या सुमारास न्यायालयात या संदर्भात निर्णय देण्यात येईल. बहुचर्चित येस बँक-डीएचएफएल प्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंवर गैरव्यवहाराचा आरोप आहे. त्यांनी गैरव्यवहारातील 292 कोटी रुपये इतरत्र वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अविनाश भोसले यांचे अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचंही सांगितलं जातंय.
सोमवारी अविनाश भोसले यांच्या आरोपांप्रकरणी युक्तिवाद पूर्ण झाला आहे. वेळेअभावी न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेत निकाल राखून ठेवला होता. सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून अटक केलेली. त्यानंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना 27 मे रोजी हजर करण्यात आलं होतं.
दरम्यान आज दुपारी 12 वाजता मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडेल. यात अविनाश भोसले यांना दिलासा मिळतो की त्यांची रवानगी सीबीआय कोठडीत होते हे पाहणं महत्वाचंय.
अविनाश भोसलेंतर्फे सोमवारी सीबीआय रिमांडला विरोध करण्यात आला होता. कोर्टाने अविनाश भोसले यांना 27 मे रोजी नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले. दरम्यान सोमवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरता सीबीआय रिमांड मागण्यात आलेली. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला विरोध केलाय.