पिंपरी-चिंचवड / रणजित जाधव (प्रतिनिधी) : रिक्षा चलाकाला नो पार्किंगचा ऑनलाईन दंड आकारला म्हणून एका रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घातली. नंतर हा वाद टोकाला गेल्याने रिक्षा चालक (Auto Driver) आणि वाहतूक पोलिसा (Traffic Police)त जोरदार फ्री स्टाईल हाणामारी (Fighting) झाली. पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पमध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर पोलीस हवालदार आणि संबंधित रिक्षा चालक पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाले.
सायंकाळच्या सुमारास पिंपरी वाहतूक विभागचे पोलीस हवालदार ऋषिकेश पाटील हे पिंपरी कॅम्प परिसरात आपले कर्तव्य बजावत होते. नो पार्किंगमधील वाहनाना दंड करण्याचं आणि ती वाहनं टोइंग करत संबंधित वाहने पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचं कर्तव्य पाटील बजावत होते.
यावेळी एक रिक्षा चालक आला आणि पोलीस हवालदार ऋषिकेश पाटील यांच्यासोबत हुज्जत घालू लागला. रिक्षा चालकाच्या रिक्षाला सकाळच्या सुमारास पिंपरीमधील क्रोमा शोरूम समोर नो पार्किंगचा दंड ठोठावण्यात आला होता.
दंड लागल्याचा राग मनात धरून रिक्षा चालक पोलीस हवालदार पाटील यांच्यासोबत हुज्जत घालू लागला. त्याचवेळी रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसांना उद्देशून अपशब्द काढले. “तुम्ही अशा पद्धतीने दंड करता म्हणून तुमचा मृत्यू होतो” असे बोलताच ह्या हुज्जतीचं रूपांतर हाणामारीत झालं.
दोघांचीही त्याठिकाणी फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. संबंधित रिक्षा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. अगदी क्षुल्लक कारणावरून पोलिसांनी भर रस्त्यात मारहाण करत कायदा हातात घेतल्याने सवाल उपस्थित केला जातोय.