मासळीचा वाद टोकाला गेला, गिऱ्हाईक पळवल्याचा आरोप करत मासे विक्रेत्यावर हल्ला

| Updated on: Oct 29, 2022 | 8:22 PM

माझे माशाचे गिऱ्हाईक पळवतो म्हणत रागातून दोघांनी शेजारी असणाऱ्या मासे विक्रेत्यांवर मासे कापायच्या कोयत्याने सपासप वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मासळीचा वाद टोकाला गेला, गिऱ्हाईक पळवल्याचा आरोप करत मासे विक्रेत्यावर हल्ला
गिऱ्हाईक पळवल्याचा आरोप करत मासे विक्रेत्यावर हल्ला
Image Credit source: TV9
Follow us on

राजगुरूनगर : कोणाची भांडण कशावरून होतील आणि कोण कशावरून कुणाचा जीव घेईल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना पुण्याच्या राजगुरूनगर शहरातून समोर आली आहे. माझे माशाचे गिऱ्हाईक पळवतो म्हणत रागातून दोघांनी शेजारी असणाऱ्या मासे विक्रेत्यांवर मासे कापायच्या कोयत्याने सपासप वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुला मारूनच टाकतो, तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत त्या मासे विक्रेत्यांवर वार केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना राजगुरूनगर येथील मच्छी बाजारात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

हल्ल्यात गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु

आमन मोमीन आणि सुफियान मोमीन उर्फ दुध्या (रा. शिंपीआळी, राजगुरूनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. सोयल रफिक मोमीन हा यात गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी आणि पीडित दोघेही मासे विक्री करतात

खेड पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, राजगुरूनगर येथील मच्छी बाजारात हे दोघे मासे विकणारे मासे विक्री करतात. दोघांचेही शेजारी शेजारी मासे विक्रीचे दुकान आहे. दुकानवरचे ग्राहक त्याच्याकडे गेल्यावर ग्राहकाला फूस लावतो, तसेच कमी दराने मासे विक्री करून आमचे ग्राहक पळवतो, असा संशय दुसऱ्या विक्रेत्याला निर्माण झाला.

याच वादातून आमन आणि सुफियान यांनी सोयलशी वाद घालण्यास सुरुवात केली. माझ्याकडे आलेले गिऱ्हाईक पळवितो, तुला आता मारूनच टाकतो, तुला जिवंत ठेवत नाही, अशी धमकी देत सोयलवर वार केले. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.