पुणे: पुण्यात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवल्यानंतर त्यात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं. पती, पत्नी आणि दोन मुलं यांनी विष प्राशन केलं. त्यामुळे संपूर्ण पुणे हादरून गेलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
पुण्यातील मुंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. एकाच कुटुंबातील चार जणांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या चौघांनी आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
दीपक थोटे (वय 59), इंदू दीपक थोटे (वय 45), मुलगा ऋषिकेश दीपक थोटे (वय 24) आणि मुलगी समीक्षा दीपक थोटे (वय 17) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते. त्यापूर्वी हे कुटुंब अमरावतीत राहत होतं. सध्या ते मुंढव्याच्या केशव नगर परिसरात राहायला आले होते, असं सांगितलं जातं.
थोटे कुटुंबाने शेअर मार्केटमध्ये काही रक्कम गुंतवली होती. मात्र, त्यात प्रचंड नुकसान झाल्याने या कुटुंबासमोरच्या आर्थिक समस्या वाढल्या होत्या. आर्थिक तंगीमुळे या कुटुंबाची आर्थिक ओढताण होत होती. त्यामुळेच या कुटुंबाने आत्महत्या केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कुटुंबातील चारही जणांनी नेमकी आत्महत्या का केली? याचा पोलीस शोध घेत आहेत.