पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढून मग बलात्कारा (Rape)चा गुन्हा दाखल करण्याची धमकी (Threat) देत पुण्यात तरुणीने एका तरुणाकडून तब्बल 67 लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. अक्षय तांबे असे पीडित असे तरुणाचे नाव आहे. अक्षयची सदर तरुणीसोबत सोशल मीडिया (Social Media)च्या माध्यमातून ओळख झाली होती. यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर तरुणीने त्याला बलात्काराची धमकी देत तब्बल 67 लाख रुपये उकळले. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तरुणीसह तिच्या दोन साथीदारांनाअटक केली आहे. चेतन रवींद्र हिंगमारे (रा. कालेपडळ, हडपसर) आणि निखिल उर्फ गौरव म्हेत्रे(27, गाडीतळ, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपी तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि तरुणीची सोशल मीडियावर ओळख झाली होती. या दोघांमध्ये झालेली ही ओळख प्रेम आणि शरीर संबंधापर्यंत पोहचली. या तरुणीने तिच्या दोन साथीदारांसह फिर्यादीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तरुणीने आपण अल्पवयीन असून आपल्यावर तू बलात्कार केला आहे आणि यातून गर्भधारणा झाली आहे, असं सांगत तरुणाला धमकी दिली. प्रकरण मिटवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील म्हणून त्या तरुणीने 67 लाख रुपयांची मागणी केली. समाजात बदनामी होऊ नये यासाठी त्या तरुणाने 67 लाख रुपये त्या तरुणीला दिले. मात्र त्या तरुणीने अधिक पैसे मागायला सुरुवात केली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या तरुणाने गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित तरुणीसह तिच्या दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. (Honey trap in Pune, looted lakhs of rupees from youth by threatening to file a case)