पुणे : दारूच्या नशेत पुरूषांचा धिंगाना नेहमीच आपण पाहिला असेल. परंतू एखाद्या महिलेने दारूच्या नशेत काय तमाशा केला ते पाहून पुणेकरांच्या नाकीनऊ आले. या महिलेने दारूच्या नशेत जो काही गोंधळ घातला ते पाहून हॉटेलात मस्तपैकी जेवत बसलेल्या ग्राहकांच्या काळजाचेच काय तर जेवणाचेही पाणी…पाणी झाले. त्याचे झाले काय या महिलेने दारूच्या नशेत हॉटेलातील ग्राहकाच्या भरल्या ताटात जाऊन पाणी ओतल्याने सर्वांची उपासमार तर झालीच शिवाय महिला पोलीसांनाही तिने सोडले नाही.
पुण्याच्या मार्केट यार्ड परीसरातील श्री सागर हॉटेलात एका 45 वर्षीय महिलेने शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास दारूच्या नशेत अक्षरश: धिंगाना घातला. याबाबत मार्केटयार्ड पोलिसांनी दिलेल्या माहीतीनूसार श्री सागर हॉटेलात या महिलेला जेवणात गरमागरम भाकरी न मिळाल्याने तिने अक्षरश: संपूर्ण हॉटेल डोक्यावर घेतले. दारुच्या नशेत या महिलेने हॉटेल कर्मचाऱ्यांना शिव्या घालायला सुरूवात केली. तसेच हॉटेलच्या मॅनेजरलाही फैलावर घेतले. तिला आवरण्याचा प्रयत्न केला असता तिने आपल्याला भाकरी का नाही दिली असा धोशा लावत हॉटेलात जेवत असलेल्या इतरांच्या ताटात भाकरी बघून त्यांच्या ताटात थेट पाणीच ओतले. याबाबत भांबावलेल्या हॉटेल मॅनेजरनी या महिलेची शंभर नंबरवर तक्रार केली. पोलीसांनी हॉटेलमध्ये येत या महिलेची कशीबशी मनधरणी करीत तिला हॉटेलातून पोलीस ठाण्यात नेले.
मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात या दारूड्या महिलेला जीपमधून नेले तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतू हॉटेलपेक्षाही मोठा राडा या महिलेने पोलीस ठाण्यात घातला. महिला पोलिसाच्या नेमप्लेटकडे पाहून तिचे नाव वाचत या महिलेने, माने का तू , मी कोण आहे ते तुला दाखवतेच असे म्हणून तिची नेमप्लेटच ओढली. तसेच शिवीगाळ करीत महिला पोलिसांनाच मारहाण केली. तिला पकडायला आलेल्या महिला शिपायाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला पकडून तिने चांगलाच पिरगळला आणि अंगठ्याला चावून रक्तबंबाळ केले. यावेळी मोठा फौजफाटा आणून या महिलेला अखेर अटक करून कोठडीत डांबण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.