अभिजीत पोते, TV9 मराठी, पुणे : पुण्यात आलिशान गाडी देतो म्हणून पुण्यातील चार जणांनी मिळून 12 जणांना तब्बल 3 कोटी 28 लाख 50 हजारांचा गंडा (Fraud) घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ऋषिकेश अशोक बारटक्के याच्यासह पुण्यातील तिघांविरूध्द विटा पोलीस ठाण्यात (Vita Police Station) गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. नितीन सुभाष शहा, आदित्य दाडे आणि निलमणी धैर्यशील देसाई यांच्या विरोधात विटा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल (Fraud case registered) करण्यात आला आहे. याबाबत माहुली येथील आबासाहेब दत्ताजीराव देशमुख यांनी 3 ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली होती.
ऋषिकेश बारटक्के हा पुणे येथे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो. ऋषिकेशने निलमणी धैर्यशील देसाई याच्या मालकीची पर्वती येथील 49 गुंठे जागा कुलमुखत्यार पत्राद्वारे सर्व शासकीय कार्यवाही पूर्ण करून तो विक्री करण्यासाठी घेतल्याचे सांगून देसाईकडून घेतलेले कुलमुखत्यारपत्र देशमुख यांना दाखविले.
या जागेमध्ये असलेल्या महसुलच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि जागेमध्ये इतर कामे करण्यासाठी अंदाजे 4 कोटी रूपयांची गरज आहे. या जागेमध्ये त्यांनी गुंतवणूक केल्यास रक्कमेवरती 3 महिन्यामध्ये दीडपट मोबदला बारटक्के आणि शहा हे देतील. तसेच नवीन चारचाकी अलिशान वाहनही देतील, असे आमिष दाखविले.
ऋषिकेश बारटक्के आणि नितीन शहा यांच्याकडे एकूण 3 कोटी 58 लाख रूपये दिले. त्यावेळी ऋषिकेश बारटक्के याने त्याच्याकडील फोर्ड इंडिव्हेअर ही गाडी व्यवहारापोटी आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने देशमुख यांना दिली.
परंतु बारटक्के याने ही गाडी खरेदी केल्यापासून बँकेचे हप्ते भरणा केलेले नव्हते. तसेच या गाडीवर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचा बोजा असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर देशमुख आणि त्यांच्या सोबतच्या इतर गुंतवणूकदारांनी ऋषिकेश बारटक्के आणि नितीन शहा यांच्याकडे पैशांबाबत पाठपुरावा केला.
यानंतर 18 फेब्रुवारी 2020 रोजी करारनामा करून 4 महिन्यांमध्ये पैसे देण्याचे मान्य केले. मात्र चार महिने उलटले तरी बारटक्केने पैसे परत केले नाहीत. त्याच्याकडे पैशासाठी पाठपुरावा केला असता तो टाळाटाळ करु लागला.
देशमुख यांचे 1 कोटी 51 लाख रूपये आणि इतर गुंतवणुकदाराकडील 1 कोटी 77 लाख 50 हजार असे एकूण 3 कोटी 28 लाख 50 हजार रूपये गुंतवणूक स्वरूपात घेऊन त्यावर 3 महिन्यात दीडपट रक्कम करण्याचे अलिशान गाडी देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे.