पुणे : पुण्यातील प्रसिद्ध ‘मराठे ज्वेलर्स’च्या कौस्तुभ मराठे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मंजिरी मराठे आणि कौस्तुभ मराठे यांनी ठेवीदारांना विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. मराठेंना 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
मंजिरी कौस्तुभ मराठे आणि कौस्तुभ अरविंद मराठे यांनी 18 गुंतवणूकदारांची 5 कोटी 9 लाख 72 हजार रुपयांना फसवणूक केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. पुण्यातील पौड रोड शाखा आणि लक्ष्मी रोड शाखेत ही फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे.
पौड रोड आणि लक्ष्मी रोड शाखेतील प्रकार
या प्रकरणात आधी प्रणव मिलिंद (वय 26 वर्ष, रा. रुपाली अपार्टमेंट, एरंडवणे) याला अटक करण्यात आली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर मयत मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे, त्यांची पत्नी नीना मिलिंद मराठे यांच्यासह इतरांविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जानेवारी 2017 ते जानेवारी 2021 या कालावधीत मराठे ज्वेलर्सच्या पौड रोड आणि लक्ष्मी रोड शाखेत हा प्रकार घडल्याचा आरोप आहे.
मंजिरी मराठे यांच्या बँक खात्यावर साक्षीदाराने गुंतवणूक केलेली रक्कम पाठवण्यात आली आहे. तसेच मंजिरी मराठे या 1 जुलै 2014 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत मराठे ज्वेलर्स संस्थेत भागीदार म्हणून सहभागी होत्या. आरोपींनी गुंतवणुकीपोटी साक्षीदार आणि इतरांना त्यांच्या पोचपावत्या दिल्या.
पोलीस कोठडीची मागणी
आरोपींना जामीन मिळाल्यास ते देशाबाहेर जाण्याची तसेच साक्षीदारांना धमकवण्याची शक्यता आहे. मराठे ज्वेलर्स प्रा. लि. कंपनीने आरोपी संचालकाने कॉसमॉस बँकेकडून स्टॉकच्या रकमेचाही अपहार केल्याची तक्रार प्राप्त असून त्याबाबत आरोपींकडे चौकशी करायची आहे. त्यामुळे आरोपींना 12 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील एम. बी. वाडेकर यांनी केली.
लंकड ग्रुपच्या मालकालाही अटक
दुसरीकडे, पुण्यातील लंकड रिअॅलिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ग्रुपकडून (Pune Lunkad Realty Firms) ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने लंकड रिअॅलिटी फर्म्सचा मालक अमित लंकडला (Amit Lunkad) अटक केली होती.
काय आहे घोटाळा
गुंतवलेल्या रकमेवर 15 टक्के परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले होते. मात्र परतावा न दिल्याने गुंतवणूकदारांनी पुण्यातील येरवडा पोलिसात लंकडविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या तपासानंतर गुंतवणूकदारांची थकित रक्कम तब्बल 25 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं उघड झालं होतं.
संबंधित बातम्या :
पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधू पोलिसांच्या ताब्यात, वृद्धेच्या तक्रारीनंतर गुन्हा
गुंतवणूकदारांना गंडा, पुण्यातील लंकड रिअॅलिटी फर्म्सच्या मालकाला अटक
सैन्यात आणि रेल्वेत नोकरी देण्याच्या नावावर फसवणूक, दिल्लीत हवाईदलाच्या माजी अधिकाऱ्याला अटक