Pune Bopdev Ghat Case : पुण्यातील बोपदेव घाटात रात्री फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणी आणि तिच्या मित्रावर हल्ला करण्यात आला. यावेळी ती तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत त्याला मारहाण करण्यात आली. तसेच त्या तरुणाचा शर्ट काढून त्याचे हातपाय बांधण्यात आले. यानंतर तीन आरोपींनी परराज्यातून पुण्यात शिकायला आलेलल्या त्या २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. गेल्या काही दिवसांपासून या घटनेची सखोल चौकशी सुरु होती. आता अखेर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटात तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या या तिघांची सखोल चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या तब्बल २५ टीमकडून आरोपींचा शोध घेतला जात होता. याप्रकरणी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक डेटाच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरु होता. पण मोबाईल फोनला रेंज नसल्याने आणि तब्बल दहा किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली होती. यानंतर बोपदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयिताचे एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या घटनेनंतर 15 मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपीचे स्केच काढले आणि कोंढवा पोलिसांकडून ते प्रसिद्ध करण्यात आले. याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील त्वरित संपर्क साधावा असे पोलीसांनी आवाहन केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री विनय पाटणकर,संपर्क क्रमांक : 8691999689 पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 श्री.युवराज हांडे संपर्क क्रमांक : 8275200947 /9307545045 किंवा नियंत्रण कक्ष पुणे शहर 020-26122880 यावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच याप्रकरणी तीन हजार मोबाईल वापरकर्त्यांची माहितीही पोलिसांकडून काढण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक तपासण्याचे काम करत आहेत. पोलिसांकडून दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात येत आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही सापडतंय का याचाही तपास सुरु आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.