पुणे : पुणे जिल्ह्यात 24 तासांत दोन हृदयद्रावक घटना घडल्या. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 9 जणांचा बुडून मृत्यू झालाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पुण्यात गुरुवारी भोरच्या भाटघर धरण (Bhatghar Dam) आणि खेड तालुक्यातील चास कमान धरणावर (Chas Kaman Dam) ही दु:खद घटना घडली. भाटघर धरणावर 5 तरुणी गेल्या होत्या. संध्याकाळी पाचच्या सुमारास त्या धरणातील पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक रेस्क्यू टीम आणि गावकऱ्यांच्या मदतीने शोधकार्य (Search Operation) सुरु करण्यात आलं होतं. तर चासकमान धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून चौघांचा मृत्यू झाला. संपूर्ण पुणे जिल्ह्यात या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. हृदयद्रावक बाब म्हणजे यातील सर्व मृतांचे वय हे 16 ते 23 दरम्यान होते.
भाटघर धरणात बुडालेल्या पाचही तरुणी हडपसरच्या रहिवासी होत्या. त्या सर्वजणी भाटघर धरणावर फिरण्यासाठी आल्या होत्या. मात्र, खोल पाण्यात गेल्यामुळे त्या धरणात बुडाल्या. यातील सर्व तरुणींचे मृतदेह हाती लागले आहेत. तरुणींच्या कुटुंबियांना याची माहिती मिळताच ते भाटघर धरणावर दाखल झाले. त्यावेळी त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
दुसऱ्या घटनेत पुण्याच्या खेड तालुक्यातील चास कमान धरणात पोहायला गेलेल्या 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यात दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनींचा समावेश होता. हे विद्यार्थी सह्याद्री स्कूलचे होते. गुंडाळवाडी येथील तिवई हिल परिसरात सह्याद्री स्कूल आहे. या ठिकाणी निवासी विद्यार्थी असतात. उद्या शाळेला सुट्टी लागणार असल्याने 10 वी च्या वर्गात शिकणारे चौघे तिवई हिलच्या पायथ्याशी असलेल्या चास कमान धरणात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोठ्या लाटेसोबत ते पाण्यात बुडाले. परिक्षित अग्रवाल, रितीन डीडी, तनिशा देसाई आणि नव्या भोसले असं या विद्यार्थ्यांची नावं होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र, चौघांचे मृतदेह त्यांच्या हाती लागले.
भाटघर धरणावर घडलेल्या दुर्घटनेत एक 9 वर्षांची चिमुरडी सुदैवानं बचवाली आहे. एक तरुणी बुडत असल्यानं इतर चौघी जणी पाण्यात तिला वाचवण्यासाठी उतरल्या होत्या. तर सोबत असलेली लहान मुलगी काठावरच थांबली होती.
पाचही तरुणींना पाण्याचा अंदाज आला नसल्यानं त्या पाण्यात गुदमरल्या आणि नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा जीव गेला. दरम्यान, नऊ वर्षांच्या मुलीनं अंगावर काटा आणणारा मृत्यू थरार काठावरुन अनुभवला. पुण्यातील यो दोन्ही दुर्दैवी घटनानंतर हळहळ व्यक्त केली जातेय.