पुणे : सणासुदीचे दिवस सुरु झालेत. अशातच स्वयंपाकाला वापरण्यासाठी सर्रास वापरलं जााणार तूप हे भेसळयुक्त असण्याची भीती व्यक्त केली जातेय. नुकतीच पुण्यात (Pune Crime News) मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 150 लीटर तूप जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध (FDA) प्रशासनानं केलेल्या कारवाईत 150 लीटर तूप भेसळयुक्त असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे बाजारात तुपावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून तुमच्या स्वयंपाक घरातील तूप भेसळयुक्त तर नाही ना, अशीही शंका घेतली जातेय. पुणे अन्न आणि औषध प्रशासनासोबत पोलिसांच्या संयुक्त सहकार्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांसह (Pune Police News) अन्न आणि औषध प्रशासन पुढील तपास करत आहेत.
पुण्यातील कात्रज भागात धाड टाकत 150 लिटर भेसळयुक्त तूप पकडण्यात आलं. अन्न आणि औषध प्रशासनासोबत मंगळवारी पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. डालडा आणि जेमिनीचं तेल एकत्र करुन तुपाची भेसळ केली जात होती. तसंच या कारवाईदरम्यान, अनेक केमिकलयुक्त पदार्थही आढळून आले आहे. आता ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर भेसळयुक्त तुपाचं रॅकेट कुठपर्यंत पसरलेलं आहे, हे स्पष्ट होईल. या कारवाईदरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाने 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
या कारवाईमुळे आता पोलिसांसह अन्न आणि औषध प्रशासनाच्यावतीने लोकांना आवाहन करण्यात आलं आहे. घरोघरी वापरलं जाणारं तूप तुम्ही कुठून खरेदी करता? त्या तुपात भेसळ तर झालेली नाही ना? याची शहानिशा करण्याचीही गरज यानिमित्तानं व्यक्त करण्यात आलीय. अन्यथा भेसळयुक्त तूप खाणं अंगलट येऊ शकतं, अशीही शंका घेतली जातेय. त्यामुळे तूप खरेदी करताना काळजी घ्यावी, असं जाणकार सांगतात.