पुणे गुन्हे शाखेने अखेर सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली आहे. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर आरोप आहे. तसेच हिट अँड रन प्रकरणीही त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना आज अटक करण्यात आली. या अटकेनंतर अग्रवाल यांच्या निवासस्थानी जाऊन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी केली. या झाडाझडतीत पोलिसांनी काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी अग्रवाल कुटुंबातील नोकरांनाही प्रश्न केले आहेत. प्रत्येकाला पोलिसांनी चार प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे अग्रवाल कुटुंबाची कोंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कल्याणी नगरमध्ये झालेल्या हिट अँड रन केसमध्ये पोलिसांनी अग्रवाल कुटुंबातील ड्रायव्हरला अटक केली आहे. या ड्रायव्हरचा कबुली जबाब नोंदवून घेतला आहे. अग्रवाल पिता-पुत्रांनी ड्रायव्हरला दोन दिवस घरात कोंडून ठेवल्याचा आरोप आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने आज ड्रायव्हरला अग्रवाल यांच्या घरी नेऊन क्राईम सीन क्रिएट केला होता. ज्या खोलीत सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवालने धमकावले, त्याच खोलीत ड्राव्हरला नेण्यात आले. त्यानंतर गुन्हे शाखेने घरात उपस्थित असलेले कर्मचारी आणि रजिस्टरही तपासले. घरातील कर्मचाऱ्यांना काही प्रश्नही विचारले.
1- गेल्या शनिवारी पोर्शे कार घेऊन वेदांत, ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडले?
2- त्यावेळी घरात कोण कोण होते?
3- तुम्हाला पोर्शे कार घ्यायला कोणी पाठवले?
4 अग्रवाल यांच्या बंगल्यात येणाऱ्या सर्व वाहनांची नोंद रजिस्टरमध्ये होते का?
घरातील नोकरांना हे प्रश्न विचारल्यानंतर पोलिसांनी अग्रवाल कुटुंबाच्या ऊर्वरीत वाहनांची माहितीही मागवली आहे. आता या प्रकरणात ड्रायव्हर गंगाराम पुजारी यांच्या पत्नीचीही चौकशी केली जाणार आहे. पार्वती पुजारी असं गंगाराम पुजारी यांच्या पत्नीचं नाव आहे. गंगारामला खरोखरच डांबून ठेवलं होतं का? कोणी डांबून ठेवलं होतं? गंगाराम घरातून कधी बाहेर पडला. किती दिवसानंतर आला? त्याला काही अमिष दाखवलं गेलं होतं का? आदी प्रश्न पोलिसांकडून पार्वती यांना विचारले जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे.
गंगाराम पुजारी याची पत्नी पार्वती ही या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असणार आहे. त्यामुळे तिचा कोर्टासमोर जबाब नोंदवला जाणार आहे. सीआरपीसी कलम 164 नुसार तिचा जाब नोंदवला जाणार आहे. कोर्टासमोर जबाब नोंदवण्यात आल्यानंतर तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो आणि बदलता येत नाही.त्यामुळे ड्रायव्हरच्या पत्नीचा जबाब गुन्हे शाखा कोर्टासमोर नोंदवणार आहे. गुन्हे शाखा आजच यासाठी कोर्टात अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.