Pune Crime : महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. या योजनेद्वारे राज्यातील महिलांना दर महिना १५०० रुपये दिले जातात. मात्र आता या योजनेमुळे एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेतील पैशांचे वाटप सुरू असल्याचे सांगत चोरट्याने त्या महिलेचे ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर भागात गुरुवारी एक धक्कादायक प्रकार घडला. गुरुवारी (२८ नोव्हेंबर) एका ज्येष्ठ महिलेने पुण्यातील हडपसर पोलिसात तक्रार दाखल केली. ही तक्रारदार ज्येष्ठ महिला हडपसर भागात राहायला आहेत. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास त्या हडपसरमधून निघाल्या. त्यावेळी एका चोरट्याने त्यांना अडवले. आमचे साहेब ला़डकी बहीण योजनेतंर्गत पाच हजार रुपयांचे वाटप करत आहे. यावेळी त्या चोरट्याने त्यांना बोलण्यात गुंतवले आणि त्यांना मंगळसूत्र आणि अंगठी काढून ठेवण्यास सांगितले. यानंतर त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधत चोरट्याने त्यांचे दागिने लंपास केले आणि तो पसार झाला.
सध्या या प्रकरणाचा पूर्ण तपास पुणे पोलिसांकडून सुरु आहे. पुणे पोलिसांकडून या चोराला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. दरम्यान सध्या पुण्यात मोफत साडी, पैसे वाटप यांसारखी अनेक अमिष दिली जात आहेत. यामुळे महिलांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढत आहे. काही दिवसांपूर्वी स्वारगेटमध्येही एका चोरट्यांनी महिलेकडील ४० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती.