पुणे : पुण्यात गुन्हेगारी फोफावत असल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. कधी कोयता गँगच्या दुष्कृत्यांमुळे पुणे हादरतं, तर कधी चोरीच्या घटानांमुळे पुणे (Pune) हादरतं. आता तर एका चोरीच्या प्रकरणावर खूप मोठा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे. चोर चोरी करतो तेव्हा तो आपल्या भोवतीच असतो. पण तो चोर आहे याचा आपल्याला थांगपत्ताही तो लागू देत नाही. पण या अशा चोरांच्या मुसक्या आवळण्यात महाराष्ट्र पोलीस पारंगत आहेत. अशा अनेक मोठमोठ्या चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. आतादेखील पुणे पोलिसांना एक अट्टल चोराला पकडण्यात यश आलं आहे. विशेष म्हणजे या चोराने भिकारी असल्याचं नाटक करत दुकानात चोरी केल्याचं उघड झालंय.
पुणे शहरात सध्या घरफोडी आणि चोरीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. अशातच एमजी रोड येथे असणाऱ्या पवित इंटरप्राईजेस या मोबाईलच्या दुकानातून तब्बल 18 लाख 10 हजार 500 रुपयांचे मोबाईल, लॅपटॉप आणि काही भारतीय चलन, असा मुद्देमाल चोरी करण्यात आला. संबंधित घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला होता. पोलिसांनी या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, चोरांना शोधून काढावं, अशी मागणी तेथील स्थानिकांकडून जोर धरु लागत होती. त्यामुळे पोलिसांपुढेही दबाव वाढला होता. पण पोलिसांना अखेर या प्रकरणात यश आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपीने दुचाकी गाडी दूर अंतरावर पार्क करून भिकारी असल्याचं भासवलं. नंतर फूटपाथवर झोपण्याचा बहाना केला. त्यानंतर त्याने मोबाईल दुकानाचे मेन शटर आणि दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. आरोपीचा हा कारनामा एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय. त्यातून पोलिसांना आरोपीचा शोध लावण्यात यश मिळालं. पोलिसांनी यासाठी अथक परिश्रम केले. त्यानंतर त्यांना आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आलं.
पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमधील एक इसम भिकारी असल्याचं दिसत होतं. या गुण्याचा तपास सुरू असताना आयएमईआय नंबर ट्रेसिंगसाठी देण्यात आले होते. त्याद्वारे आरोपीचा शोध घेत असताना गुन्ह्यातील केदार सुरेश शिंदे याला लोहियानगर येथून अटक करण्यात आले. सुरेशची चौकशी दरम्यान त्याने आधी सांगितले की, असीम शब्बी याचा मोबाईलचा व्यवसाय आहे. त्याच्याकडूनच हा मोबाईल घेतला आहे.
यानंतर असीम शब्बी याला 1 एप्रिलला अटक करून त्याच्याकडून 9 लाख किमतीचे 14 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये सॅमसंग फोल्ड थ्री, अल्ट्रा सॅमसंग नोट टेन या मोबाईलचा समावेश आहे. या गुन्ह्यातील लॅपटॉप आणि रोख रक्कम 6 लाख रुपये याबाबत आरोपींकडून चौकशी केली जात आहे. पोलीस या प्रकरणी आणखी नेमकी काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.