भंगारात सापडलेल्या स्कॉचच्या बाटल्यांतून बनावट मद्याची विक्री, मुंबईच्या दोघांना पुण्यात अटक

| Updated on: Jul 05, 2021 | 9:50 AM

विक्रम दिनेश वाघेला (वय 26 रा. कांदिवली पूर्व, मुंबई) आणि सुनील दाजी जुलूम (वय 34 रा. धारावी, मुंबई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. आरोपींना पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

भंगारात सापडलेल्या स्कॉचच्या बाटल्यांतून बनावट मद्याची विक्री, मुंबईच्या दोघांना पुण्यात अटक
स्कॉचच्या बाटल्यांतून बनावट मद्य विक्री
Follow us on

पुणे : उच्च प्रतीच्या विदेशी स्कॉचच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट मद्य भरुन विकणाऱ्या दोघा जणांना पुण्यात बेड्या ठोकण्यात आल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कात्रज परिसरात आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून साडेतीन लाख रुपयांच्या बनावट स्कॉचसह सुमारे साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Pune police arrested two for selling Counterfeit liquor in Scotch bottles)

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालिका उषा वर्मा, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक संतोष घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एस आर पाटील, संजय जाधव, संजय पाटील यांच्यासह भरारी पथक क्रमांक एकच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

आलिशान कारमधून आरोपी पुण्याला

विक्रम दिनेश वाघेला (वय 26 रा. कांदिवली पूर्व, मुंबई) आणि सुनील दाजी जुलूम (वय 34 रा. धारावी, मुंबई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. आरोपींना पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हे दोघे मुंबईवरून आलिशान मोटारीतून विविध ब्रँडच्या बनावट स्कॉचच्या बाटल्या घेऊन विक्रीसाठी पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज डेअरीसमोर आले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

भंगारातील बाटल्यांमध्ये मद्य भरुन विक्री

पंचतारांकित हॉटेल्स आणि सोसायट्यांमधून भंगारमध्ये आलेल्या रिकाम्या स्कॉचच्या बाटल्यांमध्ये साधे मद्य भरून बनावट स्कॉच विकली जात होती. अवैध मद्याबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक संतोष झगडे यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या :

गोठ्यात आणि कारमध्ये लाखोंची बनावट दारू लपवली, पोलिसांना खबर लागली आणि…

(Pune police arrested two for selling Counterfeit liquor in Scotch bottles)