पुणे : सिंहगड रोड (Sinhgad Road Police) पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी तिघांना अटक केली. धायरी (Dhayari) येथे करण्यात आलेल्या हॉटेल मॅनेजरच्या हत्येप्रकरणी (Pune Murder News) ही अटक करण्यात आली. तिघा आरोपींसह एका अल्पवयील मुलालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड घडलं असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. 24 वर्षीय भरत भगवान कदम यांची हत्या करण्यात आली होती. शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री हे हत्याकांड घडलं होतं. या हत्याप्रकरणी सिंहगड पोलीस तपास करत होते. पण तपासाअंती महत्त्वपूर्ण खुलासे पोलिसांनी केले आहेत.
हत्या करणाऱ्या प्रमुख आरोपीला भरत कदम यांच्याविरोधात मनात राग होता. भरत आणि आरोपी मुलाच्या प्रेयसीचं असलेलं नात हे या हत्याकांडाचं मुख्य कारण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
भरत कदम हा तरुण मॅनेजर म्हणून एका गारवा बिर्याणी या हॉटेलात कामाला होता. शनिवारी काम संपवून तो घरी जात होता. त्यावेळी धायरी येथे काही तरुणांनी पाठलाग करुन त्याला गाठलं आणि त्याची चाकूने भोसकून हत्या केली होती.
दुचाकीवरुन भरत घरी जात असताना मध्यरात्री त्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे सिंहगड रोड परिसरात एकच खळबळ उडाली होती. या हत्याकांड प्रकरणी सिंहगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या हत्येप्रकरणी अनिकेत मोरे, वय 25, धीरज सोनावणे, वय 19 आणि योगेश पावले, वय 19 या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या या चारही जणांची कसून चौकशी केली जाते आहे.