Pune Police Raid On Hookah Parlour : पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. याप्रकरणी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या मुलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बाकेर रमेश बागवे (36), हरुन नबी शेख (25), बिक्रम साधन शेख (25), अमानत अन्वर मंडल (22), अमानत अन्वर (24) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या ‘द व्हिलेज’ या हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का दिला जात असल्याची माहिती पोलिसांच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलिस निरीक्षक ( गुन्हे) मानसिंग पाटील आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री संबंधित हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांच्या हाती घबाड लागलं आहे.
हा संबंधित हुक्का पार्लर हा माजी गृहराज्यमंत्र्याच्या मुलाचा असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील काँग्रेस नेते व माजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा मुलगा हा हुक्का पार्लर चालवत होता. त्यामुळे त्यांच्या मुलासह 5 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाकडून चालवल्या जात असलेल्या या हॉटेलमध्ये बेकायदेशीर पद्धतीने हुक्का पुरवला जात होता. याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
कोंढवा पोलिसांनी या हॉटेलमध्ये छापा टाकत 23 हजार 500 रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. तसेच हुक्क्याचे फ्लेवर्स आणि काचेचे नऊ हुक्का पॉटही जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी रमेश बागवे यांचा मुलगा बाखेर बागवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाखेर बागवेसह हरुन नबी शेख, बिक्रम साधन शेख, अमानत अन्वर मंडळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बाखेर रमेश बागवे हा माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा पुत्र आहे. या कारवाईनंतर आता पुण्यातील अन्य काही हॉटेल्स पोलिसांच्या रडारवर आली आहेत.