पुणे : पुण्यातील मार्केट यार्डमध्ये गोळीबार करत 28 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या सात आरोपींच्या मुसक्या आवळण्यास पुणे पोलिसांना यश आले आहे. मार्केट यार्डमधील अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून आरोपींनी एक राऊंड फायरिंग केली. मग बंदुकीचा धाक दाखवत कार्यालयातील 28 लाखाची रोकड लुटत पसार झाले होते. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत होते.
आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी पाच पथकं तयार केली होती. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत होते. या घटनेत एकूण 11 आरोपींचा समावेश होता. यापैकी सात आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींवर याआधी देखील विविध गुन्हे दाखल आहेत. विविध गुन्ह्यांमध्ये यातील आरोपी हे येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होते.
अंगडिया या व्यावसायिकाच्या कार्यालयातून पैसे लुटण्याचा त्यांचा कट देखील पूर्वनियोजित होता. हे बहुतांश आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून ते पुण्यातील मंगळवार पेठ, शिवाजीनगर, शिवणे या भागात रहायचे. यापैकी दोघांवर मोक्का दाखल आहे.
अंगडियावर दरोडा टाकला तरी ते पोलिसात जाणार नाहीत, असा विश्वास आरोपींनी होता. यातूनच त्यांनी हा दरोड्याचा कट रचला तसेच तिथे गोळीबार देखील केला होता.
तपासादरम्यान हे आरोपी मावळमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मावळमध्ये सापळा रचून आरोपींना अटक केली. यापैकी 4 आरोपी अद्याप फरार असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
सीसीटीव्हीच्या आधारे क्राईम ब्रँचने अवघ्या 48 तासात आरोपी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 14 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.