पुणे : पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाटात सेल्फी घेताना 600 फूट खोल दरीत पडलेल्या शिक्षकाचा मृतदेह काढण्यात नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर स्थानिक रेस्क्यू टीमला मध्यरात्री 3 वाजता यश आलंय. अब्दुल शेख असं या शिक्षकाचं नाव आहे. घाटात वाघजाई मंदिर परिसरात गाडी रस्त्याच्या कडेला लावून माकडांना खायला देत सेल्फी घेत असताना संध्याकाळी सुमारे 5 वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर या परिसरात असणाऱ्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाला ही माहिती दिल्यानंतर शोधकार्य सुरू करण्यात आलं होतं.
मयत शिक्षक पुण्याहून भोरमार्गे महाडला चालले होते. यावेळी वरंध घाटात सेल्फी घेताना खोल दरीत पडला. त्यानंतर पहाटे सुमारे तीन वाजता अंधारात आणि दाट झाडीझुडपातून हा मृतदेह दरीतून वर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलं. महाडची साळुंखे रेस्क्यू टीम आणि भोरच्या सह्याद्री सर्च रेस्क्यू टीमकडून हे शोधकार्य करण्यात येतं होतं.
या घटनेत मृत्यू झालेले अब्दुल कुदबुद्दीन शेख हे मूळचे लातूर जिल्ह्यातील एरंडी कोरंगळा येथील रहिवासी असून, ते सध्या त्यांच्या पत्नीसह भोर तालुक्यातील नसरापूर येथे राहत होते. तसेच ते रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस होते. तर त्यांची पत्नी वेल्हा तालुक्यातील करंजावणे येथे प्राथमिक शिक्षिका आहे.
भोरहून वरंध घाट मार्गे मंडणगडला जात असताना रस्त्यात सेल्फी घेण्यासाठी थांबले असताना हा अपघात घडला आसावा असा अंदाज स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी वर्तवलाय. घटनास्थळी संबंधित व्यक्तीची लाल रंगाची कार आढळून आली.
त्यावरून पुढील तपास करत पोलिसांनी त्यांच्या घरच्यांचा शोध घेतला. भोर पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी उद्धव गायकवाड आणि विकास लगस पुढील तपास करत आहेत.