पुणे : पुण्यात गुन्हेगारी कमी होण्याचे किंवा थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. दिवसेंदिवस गुन्हेगारांची दहशत वाढतच चालली आहे. शहरात कोयता गँग अधिक सक्रिय झालेली पहायला मिळतेय. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोयता गँगने राडा घातला होता. याला आठवडा पण झाला नाही तोपर्यंत पुन्हा पुण्यात कोयता गँगने दहशत माजवत एका हॉटेलची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पुण्यात सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, वारजे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोयता गँगकडून दहशत माजवली होती. आता पुन्हा एकदा पुण्यातल्या भवानी पेठेत असणाऱ्या एका हॉटेलच्या बाहेर कोयता गँगने दहशत माजवत तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आझम कॅम्पस परिसरातील हॉटेल बाहेर या कोयता गँगने राडा घातला आहे. पाच ते सहा जणांनी हॉटेलमध्ये घुसून कोयत्याने तोडफोड केली आहे. ही घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
नववर्षाच्या पहिल्या दिवशीही पुण्यातील नवा वाडा येथे कोयता गँगने धुमाकूळ घातला होता. काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. या भांडणातून पाच जणांनी हातात कोयता घेऊन नवा वाडा येथे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. सीसीटीव्हीच्या आधारे दहशत माजवणाऱ्या पाच आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. यापैकी काही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत.