पुणे : अज्ञात कारणातून भाडेकरु असलेल्या परप्रांतीय व्यक्तीची आज सकाळच्या सुमारास हत्या केल्याची घटना शिरुरमध्ये उघडकीस आली आहे. सुशांत अनिल करकरमर असे हत्या करण्यात आलेल्या 46 वर्षीय इसमाचे नाव आहे. ही हत्या कुणी आणि कोणत्या कारणातून केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील तुळजाभवानी नगरमध्ये एका दुमजली इमारतीतील पहिल्या मजल्यावर सुशांत भाड्याने राहत होता. सकाळी सहाच्या सुमारास त्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने दुसऱ्या मजल्यावरील भाडोत्री खाली धावत आला.
सुशांतच्या रुममध्ये जाऊन पाहिले असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याने तात्काळ इमारत मालक रफीक अब्दुल पठाण यांना फोन करुन घडला प्रकार सांगितला. यानंतर इमारत मालक तात्काळ घटनास्थळी दाखल झाला.
मालकाने तात्काळ सुशांतला अॅम्बुलन्समधून शिक्रापूर सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. यानंतर शिक्रापूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. शिक्रापूर पोलिसांनी पंचनामा करत पुढील कारवाई सुरु केली.
मयत सुशांत हा मूळचा पश्चिम बंगालमधील रहिवासी असून, कामानिमित्त पुण्यात राहत होता. सुशांतला कुणी आणि का मारले हे अद्याप कळू शकली नाही. तपासाअंती आणि आरोपीच्या अटकेनंतरच हत्येचे कारण स्पष्ट केले.
पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून खुनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळते. तसेच औद्योगिक वसाहती असल्याने या भागात पर प्रंतियांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर आहे.
शिरूर आणि चाकण परिसरात कामानिमित्त पर प्रंतियांची मोठी संख्या आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेकदा याचा त्रास सहन करावा लागत आहे.