पुणे : पुण्यात खडक पोलीस ठाणे हद्दीत प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. भरदिवसा एका इमारतीत चोरीची घटना घडली. आरोपी चोरी करुन घराबाहेर निघाला तेव्हा एका तरुणाला त्याच्यावर संशय आला. तरुणाने चोराला हेरण्याचा प्रयत्न केला. पण चोर पुढे पळू लागला. त्यामुळे संबंधित इसम हा चोरच असल्याची खात्री पाठलाग करणाऱ्या तरुणाला झाली. तरुण आपल्याला पकडेल या भीतीने आरोपीने पाठचापुढचा कोणताही विचार न करता थेट त्याच्यावर गोळीबार केला. पण धाडसी तरुणाने देखील हट्ट सोडला नाही. त्याने जखमी अवस्थेत चोराला पकडलं. या प्रकरणाची सध्या संपूर्ण शहरात चर्चा आहे.
आरोपी चोर हा नुकताच काही दिवसांपूर्वी नाशिक जेलमधून सुटला आहे. या आरोपीचं नाव विठलं वामन बोळे असं आहे. तो मुळचा जळगाव जिल्ह्यातील हिंगणे मळा येथील रहिवासी आहे. त्याने याआधीदेखील अनेक गुन्हे केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसेच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
आरोपी विठलं बोळे याने अन्सारी कुटुंबाच्या घरात चोरी केली. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. अन्सारी कुटुंब राष्ट्रभूषण येथील खडकमाळ येथील एका इमारतीत राहतं. दरम्यान दुपारी जेवण केल्यानंतर ते टेरेसवर फिरायला जातात. ते नेहमीप्रमाणे आजही (2 सप्टेंबर) टेरेसवर गेले होते. घराचा दरवाजा उघडाच होता. यावेळी विठलं हा घरात शिरला आणि त्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला.
आरोपी बोळे चोरी केल्यानंतर खाली येत होता. खाली येत असताना त्याला 23 वर्षीय अवेज सलीम अन्सारी या तरुणाने पाहिले. अवेजने आरोपीचा पायऱ्यांवर पाठलाग सुरु केला. यावेळी चोराने अवेजवर गोळीबार केला. या गदारोळात एक गोळी अवेजच्या हाताला लागली. तरीही त्याने जखमी अवस्थेत बोळेला पकडले. भरदिवसा गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत. तर धाडसी तरुण अवेजवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दुसरीकडे डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी एका सराईत चोरट्याला जेरबंद केलं आहे. रात्री गस्तीवर असताना चोराला पकडण्यात पोलिसांना यश आलं. हा चोर मुंबईत तडीपार होता. त्याने मोठ्या मोबाईल दुकानातून सात महागडे मोबाईल चोरी केले होते. तसेच अनेक ठिकाणी घरफोडी केली होती. त्याच्यावर तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. या आरोपीतं नाव सूरज रामदास चव्हाण असं आहे.
हेही वाचा :
गणेशोत्सव तोंडावर, रत्नागिरीत एका घरात तब्बल 18 जिवंत गावठी बॉम्ब, आरोपीचा नेमका कट काय?
ते धूम स्टाईलने दुचाकीवर आले, शिक्षिका कारमध्ये जात असतानाच मोठा गदारोळ, प्रकार सीसीटीव्हीत कैद