पुणे शहरात हिट अँड रन अपघातांच सत्र अद्यापही सुरूच आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याच्या वाघोली परिसरात भरधाव वेगाने आलेल्या एका डंपरने फूटपाथवर शांतपणे झोपलेल्या 9 जणांना निर्घृणपणे चिरडलं. या भयानक अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन लहान बालकांचाही समावेश आहे. तर उर्वरित सहा जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासांठी ससूनमध्ये हलवण्यात आलं आहे. घटनेच्या वेळी डंपरचालक हा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. गजानन शंकर तोट्रे (वय 26) असे त्या चालकाचे नाव आहे. या अपघातामुळे पुण्याच एकच खळबळ माजली असून तिघांचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरात केसनंद फाट्याजवळ मध्यरात्री 1-1.30 च्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या डंपर चालकाने झोपेत असलेल्या 9 जणांना चिरडलं. फूटपाथवर झोपलेले, जखमी असलेलेल हे सर्व अमरावतीचे रहिवासी असल्याचं समजतं. काम शोधण्यासाठी ते पुण्यात आले होते आणि वाघोली परिसरातील एका फूटपाथवर ते झोपले होते. मात्र झोपेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यापैकी तिघांचा तर जागीच मृत्यू झाला, त्यांना रुग्णालयातही नेण्यात आलं नाही. तर 6 जखमींपैकी तिघांची प्रकृती ही अतिशय चिंताजनक असल्याचे समजते. त्यांच्यावर ससून रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तर तिनही मृत व्यक्तींचे मृतदेह हे पोस्टमॉर्टमसाठी ससूनमध्ये आणण्यात आले आहेत.
डंपरच्या आवाजाने झोपेतून उठलो, पण… चिमुकल्यांच्या वडिलांनी काय सांगितलं ?
वाघोली परिसरात मद्यधुंद डंपरचालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या ज्या 9 जणांना चिरडलं , त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तेव्हा नेमकं काय घडलं याचा आखोंदेखा हाल त्या मुलांच्या वडिलांनी साश्रूनयनांनी सांगितला. ” रात्री एक ते दीडच्या सुमारास हा अपघात घडला. आम्ही सगळे गाढ झोपेत होतो, अचानक डंपरचा जोरदार आवाज आला आणि आम्ही खाडकन उठलो, समोरचं दृश्य पाहून आम्हाला काही सुचेचना. आम्ही जागेवरून उठून मदत करेपर्यंतच सगळा खेळ खल्लास झाला होता, तिघजणं तर जागीच ठार झाले होते, रुग्णालयापर्यंतही पोहोचता आलं नाही. इतर जखमींना कसंबस रुग्णालयात नेलं, पण माझ्या मुलांचा जीव काही वाचू शकल नाही. ते एवढे जखमी झाले की रुग्णालयात पोहोचेपर्यंतच त्यांचा श्वास थांबला होता ” असे सांगताना त्या पित्याचे हृदय पिळवटून निघालं.
जखमी आणि मृतांची नावं समोर
रविवारी रात्री झालेल्या या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. विशाल विनोद पवार (वय 22 वर्ष), वैभवी रितेश पवार (वय 1 वर्ष) आणि वैभव रितेश पवार (वय 2 वर्ष) अशी तिघांची नावं आहेत. तर जानकी दिनेश पवार (वय 21), रिनिशा विनोद पवार (वय 18), रोशन शशादू भोसले (वय 9), नगेश निवृत्ती पवार (वय 27), दर्शन संजय वैराळ (वय 18) आलिशा विनोद पवार (वय 47) अशी 6 जखमींची नावं आहेत. त्यांच्यावर आयनॉक्स हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.