प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 1 डिसेंबर 2023 : सुशिक्षितांचं, सांस्कृतिक शहर, विद्येचं माहेर अशी खरी पुण्याची ओळख.पुण्याचे आणि पुणेकरांचे किस्से तर जगभर प्रसिद्ध. मात्र सध्या हे शहर या गोष्टींसाठी नव्हे तर वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळेच चर्चेत येऊ लागलं आहे. पुण्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस खूप वाढ होत चालली आहे. त्यातच आता पुण्याच्या पाषाण परिसरातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे.
जेवणात चिकन मिळालं नाही याचा राग आल्याने एका इसमाने भयानक कृत्य केलं. रागाच्या भरात त्याने त्याच्याच पोटच्या लेकीवर हल्ला केला. त्याने चिमुकल्या मुलीच्या डोक्यात थेट वीट मारून तिला गंभीर जखमी केले. पुण्याच्या पाषाण येथील वाकेश्वर येथे ही भयानक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी पित्याविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र घडलेल्या भीषण प्रकारामुळे ती अद्यापही भेदरलेल्या अवस्थेत आहे.
बायकोचा राग मुलीवर काढला, असला कसा पिता ?
विकास नागनाथ राठोड असे आरोपीचे नाव असून तो वाकेश्वर रोड येथे पत्नी आणि मुलीसह राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास राठोड याने सोमवारी रात्री पत्नीकडे जेवण मागितले. पत्नीने त्याला जेवायला वाढले. मात्र जेवणात चिकन नव्हते, याचा विकासला प्रचंड राग आला. त्याच संतापाच्या भरात त्याने पुढचा मागचा काहीही विचार न करता तिथेच पडलेली एक वीट उचलली आणि त्याच्या लहान मुलीच्या डोक्यात मारली. यामध्ये ती चिमुकली गंभीर जखमी झाली. याप्रकरणी आरोपी विकासचे सासरे रघुनाथ लालु पवार (रा. पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत जावयाविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. पुण्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे.