पुणे | 23 जानेवारी 2024 : पुण्यात सध्या गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. चोरी, दरोडा, घरफोडी अशा अनेक घटना, गुन्हा वाढताना दिसत आहेत. त्यातच आता विद्येचं माहेर अशी ख्याती असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहरातून पोलिसांनी एका उच्चशिक्षित चोराला अटक केली आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलं..
ओंकार विनोद बत्तुल (वय22, रा. नाना पेठ) असे या चोरट्याचे नाव असून तो चांगला पदवीधर आहे. त्याने बीएस्सीची पदवी मिळवली आहे. मात्र तरीही तो मोबाईल चोरी करायचा. शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत बेड्या ठोकल्या आणि त्याच्या ताब्यातून चोरी केलेले तब्बल 17 मोबाईलही जप्त केले आहेत. पण या घटनेने सुशिक्षितांचे शहर अशी ख्याती असलेल्या पुण्यात मोठी खळबळ माजली आहे.
17 मोबाईल जप्त
शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार हा 22 वर्षांचा असून त्याच्याकडे पदवीदेखील आहे. आरोपीने शिवाजीनगर येथील जुना तोफखाना भागातील फर्निचरच्या दुकानातून एक मोबाईल चोरी केला होता. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना त्यांच्या तपास पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार, सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलिस अंमलदार रूपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि खबऱ्यांना कामाला लावत आरोपीचा माग काढला. बऱ्याच प्रयत्नांती आरोपी ओंकारला शिवाजीनगर भागातून अटक केली. चौकशीनंतर त्याच्या ताब्यातून 1-2 नव्हे तर तब्बल 17 मोबाईल जप्त करण्यात आले.
बनावट बिल बनवून विकायचा मोबाईल
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या मोबाईल चोरीची कबुली दिली. चोरीचे मोबाईल विकण्याकरिता त्याने केलेली हुशारी पाहून पोलीस चकीत झाले. चोरीचे मोबाईल विकण्यासाठी ओंकारने एका नामांकित इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री करणाऱ्या कंपनीच्या मोबाईल विक्रीच्या मुळ बिलाचाच वापर केला. बिलाच्या पीडीएफमध्ये चोरी केलेल्या मोबाईलचे डिटेल्स एडिट करुन त्याची नव्याने पीडीएफ तयार करुन तो चोरी केलेला मोबाईल स्वतःचा असल्याचे भासवायचा आणि विकायचा. त्याने चोरीचे हे मोबाईल, दुकानदारांना बनावट बिलाची पीडीएफ व स्वतःच्या आधार कार्डच्या आधारे विकले आहेत. त्याचा हा कारनामा ऐकून पोलिसही हैराण झाले. दरम्यान, विक्रेत्यांनी जुने मोबाईल खरेदी-विक्री करताना बिलांची योग्य पडताळणी करावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.