Pune Crime : मिठाईचं आमिष दाखवत निर्जन स्थळी नेलं आणि… चिमुरडीच्या ओरडण्याने रहिवासी झाले सावध, धाव घेत..

| Updated on: Sep 18, 2023 | 4:17 PM

ती चिमुरडी मुलगी तिच्या घराजवळच्या भागात खेळत होती. तेवढ्यात तो आरोपी तेथे आला आणि त्याने तिला मिठाईची लालूच दाखवत निर्जन स्थळी असलेल्या बसमध्ये नेलं.

Pune Crime : मिठाईचं आमिष दाखवत निर्जन स्थळी नेलं आणि... चिमुरडीच्या ओरडण्याने रहिवासी झाले सावध, धाव घेत..
Follow us on

पुणे | 18 सप्टेंबर 2023 : अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीला मिठाईचं आमिष दाखवत तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अखेर पोलिसांनी अटक (crime news) केली आहे. पुण्यातील कोथरूड (kothrud area) भागात हा गुन्हा घडला आहे. ३० वर्षीय आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. क्रूरतेची सीमा पार करणाऱ्या या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

पुण्यातील कोथरूड भागात संध्याकाळी 7:30 ते 9:30 च्या दरम्यान हा गुन्हा घडला. अवघ्या चार वर्षांची ही छोटी मुलगी तिच्या घराजवळच खेळत होती. आरोपी हा तिच्या काकांच्या ओळखीचाच असल्याची माहिती पुढे आली आहे. ती मुलगी घराबाहेर खेळत असतानाच, आरोपी तेथे आला आणि तुला मिठाई देतो, असे आमिष दाखवत तिला निर्जन ठिकाणी घेऊन गेला. आणि तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

या दुर्दैवी प्रकाराबद्दल कळताच त्या चिमुरडीच्या आजोबांनी पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार त्यांच्या समोर कथन केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली. त्या चिमुरडीकडे चौकशी करण्यात आली, तिला काही फोटो दाखवण्यात आले असता, एक फोटो दाखवत तिने त्या आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत अत्याचार करणाऱ्या नरामधाला अटक केली. त्याच्यावर पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी हेमंत पाटील यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. ” एक अल्पवयीन मुलगी तिच्या घरासमोर खेळत असताना तिच्यासोबत ही घटना घडल्याचे उघडकीस आले. आरोपीने तिला मिठाई किंवा इतर खाद्यपदार्थांचे लालूच दाखवत फूस लावली आणि त्याच परिसरातील एका निर्जन बसमध्ये नेले. त्या मुलीच्या आरडा-ओरड्याचा आवाज ऐकून तेथील रहिवासी सावध झाले आणि त्यांनी धाव घेत आरोपीला रंगेहाथ पकडले. ही घटना घडली तेव्हा त्या मुलीचे आजोबा घरीच होते. त्यांना ही बातमी कळताच ते धावतच तिथे आले आणि नातीला जवळ घेतले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून, संपूर्ण प्रकार कथन करत तक्रार नोंदवली ” असे पोलिसांनी सांगितले.

मिळालेलया माहितीनुसार, त्या मुलीची आई कुटुंबासोबत राहत नाही. त्यामुळे चिमुरडी मुलगी तिच्या बाबांसोबत आणि आजी-आजोबांसोबत राहते.