अभिजीत पोटे, पुणे | 4 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात गुन्हेगारीचं (crime in city) प्रमाण वाढलं आहे. अनेक गँग्स, गुन्हेगार धुडगूस घालताना दिसतात. गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरीकही त्रस्त झाले असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे, मात्र कठोर कारवाई करताना त्यांचंही कंबरडं मोडलं जात आहे.
एकीकडे हे चित्र दिसत असताना दुसरीकडे अनेक कैदी हे उपचारांच्या नावाखाली पुण्यातील ससून रुग्णालयातच तळ ठोकूनच बसल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. राज्यभरात अनेक ठिकाणी मटका चालवणारा मटका किंग विरल सावला हा उपचाराच्या नावाखाली पुण्यातील ससून रुग्णालयातच आहे. गेले अनेक महिने, तब्बल 274 दिवस त्याचा मुक्काम रुग्णालयातच आहे. तो तिथून हललाच नाही.
असा कोणता आजार झालाय ?
कोल्हापूरचा मटका किंग सलीम मुल्ला याच्यावर कोल्हापूर पोलिसानी मोक्का अंतर्गत कारवाईत केली होती. या गुन्हात विरल हा सह आरोपी आहे. त्याच्याविरोधातही अनेक गुन्हे दाखल आहेत. विरल सावला यालाही कोल्हापूर पोलिसांनी मोक्का लावला होता. याच गुन्ह्याप्रकरणी तो येरवडा कारागृहात कैद होता. मात्र तीव्र उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे सांगत तो ससूनमध्ये दाखल झाला. आणि तब्बल 274 दिवसांपासून तो रुग्णालयात तळ ठोकून बसला आहे .
ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातील दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्यानंतर ससून रुग्णालयात पाहुणचार घेणाऱ्या कैद्यांची यादी आता समोर आली आहे.
रुग्णालयामध्ये २७४ दिवस तळ ठोकून बसल्याने उडाली खळबळ
कारागृहातील कैद्यांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना सोळा नंबर या वार्ड क्रमांक मध्ये ठेवले जाते. याचा सोळा नंबर वार्ड मध्येच हे कुख्यात आरोपी तळ ठोकून आहेत.
या मध्ये माजी आमदार अनिल भोसले पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारण्याचा पुतण्या रुपेश कृष्णराव मारणे , प्रसिद्ध रोझरी स्कूलचा मालक विनय आरणा आणि खंडणी प्रकरणातील आरोपी हेमंत पाटील हा सुद्धा ससून रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली तळ ठोकून आहे. त्याचबरोबर हरिदास कोंडीबा साठे, प्रवीण राऊत, आदित्य दादा मारणे, शिवाजी ज्ञानोबा दोरगे असे कुख्यात गुन्हेगार उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात सध्या ठोकून बसले आहेत.
ससून रुग्णालय प्रशासन अलर्ट मोडवर
सध्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये एकूण 9 कैदी उपचार घेत आहेत. प्रत्येक कैद्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, वैद्यकीय पार्श्वभूमी, त्यांच्यावर कोणत्या डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत आणि संबंधित कैद्यांना उपचारांसाठी आणखी किती काळ रुग्णालयात ठेवावे लागणार आहे, याबाबतचा अहवाल तातडीने देण्याबाबत डॉ. ठाकूर यांनी वैद्यकीय समितीला पत्र पाठविले आहे.