पिंपरी चिंचवड | 6 जानेवारी 2024 : गुन्हेगार किंवा चोर कितीही हुशार असला, कितीही शक्कल लढवली तरी एक दिवस असा येतोच जेव्हा तो पोलिसांच्या कचाट्यात सापडतोच. कायद्यापासून कोणीही गुन्हेगार पळू शकत नाही. पोलिसही तितकेच शातीर असतात, आणि ते गुन्हेगारांना त्यांच्याच पद्धतीने अडकवू शकतात. अशाच एका शातीर चोराला पुण्यात अटक करण्यात आली. घरफोडी करणाऱ्या या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली.
पिंपरी-चिंचवड येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. जयवंत उर्फ जयड्या गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्या चोरट्यासह त्याची पत्नी आणि चोरीचे दागिने घेणाऱ्या सराफालाही घेतले. तसेच आरोपीकडून 13 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
इतर कामधंदा नाही, घरफोडीलाच समजायचा नोकरी
आरोपी जयवंत उर्फ जयड्या गायकवाड हा सराईत चोरट्या आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो चोरी करतोय. उपजीविकेसाठी तो इतर काही कामधंदा करत नाही. उलट पालत ठेवून, रेकी करून, घरफोडी करणे हेच त्याच्या उपजीविकेचे साधन आहे असे पोलिसांनी सांगितले. घरफोडी करून मिळालेल्या रोख रक्कम आणि दागिन्यांवरच तो त्याची आणि कुटुंबाची उपजीविका भागवायचा.
पकडला जाऊ नये म्हणून लढवायचा नामी शक्कल
जयवंत हा गेल्या अनेक वर्षांपासून चोरी करतो. तसेच चोरी करताना तो नामी शक्कलही लढवायचा. घरफोडी केल्यावर पकडला जाऊ नये म्हणून तो एकटाच चोरी करायला जायचा. तो एकही साथीदार सोबत नेत नसे. घर फोडून, सामान लुटून तो बाहेर पडायचा. एकट्याने चोरी केल्यानंतर तो सतत राहण्याचे ठिकाण बदलून, वेषांतर करून वावरत असे. त्यामुळे पोलिस मागावर असूनही तो बराच काळ त्यांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला होता.
मात्र पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 च्या अधिकाऱ्यांनी अखेर शिताफीने जयवंतला बेड्या ठोकत अटक केली. तसेच जयवंत याची पत्नी विद्या गायकवाड आणि तो ज्याला चोरीचे जागिने विकायचा तो सराफ व्यावसायिक गौरवकुमार विजयवर्गीय या दोघांना सह आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून 13 लाख रुपयांचे दागिनेही जप्त केले आहेत