पिंपरी | 26 डिसेंबर 2023 : स्पा सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी नको ते उद्योग सुरू असतात. अशा अनेक प्रकरणांचा पोलिस उलगडा करत असतात. आता विद्येचे माहेरघर अशी ख्याती असलेल्या पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्पा सेंटर उघडून त्याच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. पिंपरी-चिंचडवड येथे पोलिसांनी कारवाई करून या स्पा सेंटरचा पर्दाफाश केला. छापा टाकून त्यांनी दोन पीडितांची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी अद्याप अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी असा केला पर्दाफाश
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि. 23) ही कारवाई केली. आकुर्डी येथील स्पा सेंटरवर छापा टाकत पोलिसांनी दोघींची सुटका केली. तर स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी आकुर्डी येथील गणेश व्हिजन मॉल येथील ब्लू स्टोन्स स्पा येथे ही कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी राकेश शिंदे,अक्षय बनकर व एक महिला आरोपी अशा तिघांना बेड्या ठोकत अटक केली. तर दोन पिडीत तरूणींची या व्यवसायामधून सुटका केली.
पैशांचै आमिष दाखवून करत होते नको ते उद्योग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीनही आरोपी आकुर्डी येथील गणेश व्हिजन मॉल येथे ब्लू स्टोन्स या नावाने एक स्पा सेंटर चालवत होते. मात्र त्या स्पा सेंटरच्या आतमध्ये वेगळेच उद्योग सुरू होते. आरोपी हे पीडित तरूणांनी पैशांचे आमिष दाखवायचे आणि या स्पा सेंटरच्या नावाखाली ते त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घ्यायचे. त्यांच्या जीवावर ते पैसे कमवत होते. याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करून छापा टाकला. आणि दोन पीडित महिलांची सुटका केली. तसेच तीन हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.