पिंपरी | 16 फेब्रुवारी 2024 : पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका श्रीमंत मित्राला फसवून त्याला गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची आणि जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी दोन पोलिसांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. देहूरोड पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात आरोपींनी ऑनलाइनद्वारे 4 लाख 98 हजार घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिरझा, शंकर गोरडे, मुन्नास्वामी, देहूरोड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ अशी आरोपींची नाव आहेत. या आरोपींपैकी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूण हा 19 वर्षांचा असून तो पिंपरी- चिंचवडमधील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेतो. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याचा विश्वास संपादन केला. त्याची सर्व माहिती घेतली. तो श्रीमंत असल्याचं कळताच त्याच्याकडून पैसे उकळायचा प्लान आखला. त्यानुसार, आरोपींनी आधीच ओळखीच्या पोलिसांना माहिती देऊन हा प्लॅन तयार केला. त्यानंतर फिर्यादी तरूणाला त्यांना एका कॅफेत बोलावलं. आणि संधी साधून त्याच्या खिश्यात गुपचूप गांजाची पुडी टाकली. प्लॅननुसार, तेथे आरोपींच्या ओळखीचे दोन पोलीस तेथे आले असता, आरोपींनी त्यांना सांगितलं. त्यानुसार, पोलिसांनी तरूणाची तपासणी केली असता, त्याच्याकडे गांजाची पुडी आढळली. अखेर त्या तरूणाला पोलिसांनी देहूरोड पोलीस ठाण्यात नेलं. कारवाई नको असेल तर वीस लाख दे अशी मागणी पोलिसांनी केली. घाबरलेल्या त्या तरूणाने कसेबसे 4 लाख 98 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर केले.
मात्र ही बाब देहूरोड पोलिसांना समजताच त्यांनी सर्व तरुणांना बोलवून चौकशी केली. खरा प्रकार उघड झाल्यावर पोलिसांनी आरोपी तरूण आणि पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आठपैकी चार जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.