खेड, पुणे / सुनील थिगळे : पूर्व वैमनस्यातून 22 वर्षीय तरुणाची सहा ते सात जणांनी जीवघेणा हल्ला करत हत्या केल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चांदूस येथे घडली आहे. शुभम निवृत्ती काळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नावं आहे. याप्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये सहा ते सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुण आणि आरोपींमध्ये दोन वर्षापासून वाद सुरु होता. त्यातच पाच-सहा दिवसापूर्वी पीडित तरुणाने आरोपींना खुन्नसने पाहिले होते. यातून हा हल्ला झाल्याची माहिती मिळते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चांदूस येथील वाळुंज वस्ती येथून शुभम हा दुचाकीवरून चालला होता. यावेळी तेथे शुभमची दुचाकी अडवून त्याच्यावर या सहा ते सात जणांनी कोयत्याने वार केले. यामधे शुभम हा गंभीर जखमी झाला तर हल्ला करून या आरोपींनी घटनस्थळावरून पळ काढला. शुभमला काही नागरिकांनी रुग्णवाहिकेतून राजगुरूनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
शुभम काळे याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती गावात मिळताच गावातील अनेक तरुण, नागरिक यांनी रुग्णालयात धाव घेतली. यानंतर गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र खेड पोलिसांनी जमावाला हटवून परिस्थिती आटोक्यात आणली. याबाबत खेड पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप अशोक कल्हाटकर, यशराज विजय वाघमारे, सूरज गोगावले, वैभव कोळेकर, शुभम उर्फ सोन्या चंद्रकांत कारले, करण कारले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या शोधात पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली.