अभिजित पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 30 जानेवारी 2024 : शहरात कायदा-सुव्यवस्था रहावी, नागरिकांना निर्धोकपणे जगता यावं, गुन्हेगारांना वचक बसावा, गुन्हे वाढू नयेत यासाठी पोलिस दल सतत कार्यरत असतं. गुन्हेगारांवर वचक ठेवणे आणि कायद्याचे पालन न करणाऱ्यांना शिक्षा करणे हे पोलिसांचे कर्तव्य. पोलिस रात्रंदिवस, न थकता कर्तव्य बजावतात, म्हणून आपण शांतपणे राहू शकतो. पण कायद्याचे हेच रक्षक भक्षक बनले तर ? कुंपणानेच शेत खाल्लं तर ? मग दाद कोणाकडे मागायची ?
कुंपणानेच शेत खाल्ल्याचा, असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. सुशिक्षितांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातच पोलिसांनी कायदा मोडत चक्क चोरी केली आहे, ती देखील पोलिस स्टेशनमध्येच. हो , हे खरं आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच दरोडा टाकला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा हा प्रताप असून त्यांनी गुन्ह्यातील जप्त केलेल्या दुचाकी सरळ विकून टाकल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आलं आहे. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे अशी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
असा उघडकीस आला गुन्हा
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या आरोपीची कसून चौकशी केली एक धक्कादायक माहिती समोर आली. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले अशी कबुली या आरोपीने दिली. या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीस कर्मचाऱ्याने, त्या बाजारात विकण्यास सांगितले, असेही आरोपीने कबूल केले.
स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. वेळोवेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशी साठी बोलावले होते मात्र त्यांनी उपस्थिती लावली नाही. परिणामी कर्तव्यात कसूरी केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. काल या चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी जाहीर केली.