Pune : विश्वास कुणावर ठेवायचा? चौकशीसाठी बोलावून महिलेला पोलीस ठाण्यातच विवस्त्र करून जबरी मारहाण; धक्कादायक प्रकाराने पुणे हादरले

| Updated on: Dec 29, 2023 | 1:21 PM

एका महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. पण त्याच पोलिस ठाण्याच तिला विवस्त्र करून अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून हे प्रकरण चांगलचं पेटलं आहे.

Pune : विश्वास कुणावर ठेवायचा? चौकशीसाठी बोलावून महिलेला पोलीस ठाण्यातच विवस्त्र करून जबरी मारहाण; धक्कादायक प्रकाराने पुणे हादरले
Follow us on

विनय जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 29 डिसेंबर 2023 : पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी असतात, लोकांचं संरक्षण करणं हे त्यांच कर्तव्य असतं. पण त्याच पोलिसांमुळे सामान्य जनतेला त्रास झाला तर ? अशावेळी फिर्याद कोणाकडे करायची ? सांस्कृतिक शहर, विद्येचं माहेरघर अशी ख्याती असलेल्या पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. तेथे एका महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. पण त्याच पोलिस ठाण्याच तिला विवस्त्र करून अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून हे प्रकरण चांगलचं पेटलं आहे.

त्या महिलेला विवस्त्र करून दोन पुरुष आणि एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची महिला आघाडी आक्रमक झाली आहे. याप्रकरणी त्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण या पोलीस कर्मचाऱ्यांवर लावण्यात आलेली कलमं पुरेशी नसून, त्यांच्यावर कडक कलमं लावून संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पुणे शहर महिला प्रमुख पूजा रावेतकर यांनी केली आहे.

नेमकं काय घडलं ?

पुण्यात मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेला चौकशीसाठी बोलवून तिला दोन पुरुष आणि एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून विवस्त्र करून अमानुष मारहाण झाल्याच्या आरोप करत या कारणावरून शिवसेना शिंदे गटाची महिला आघाडी आक्रमक झाली. सुरुवातीला या विरोधात तक्रार घेण्यासं टाळाटाळ केली जात होती. मात्र महिलांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर तिघा पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या पतीवर मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. मात्र तो सध्या फरार असल्याने त्याचा पत्नीला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या चौकशी दरम्यान दोन पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांसह एका महिला कर्मचाऱ्याने तिच्या तीन वर्षाच्या बाळासमोरच तिला अश्लील शिवीगाळ केली. एवढंच नव्हे तर आपल्याला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला.

या प्रकरणाची माहिती पीडित महिलेने शिवसेना शिंदे गटाचे महिला आघाडीला दिली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या पुणे शहर महिला प्रमुख पूजा रावेतकर यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या ह्या मुंडवा पोलीस स्टेशन मध्ये गेल्या. आणि या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. सुरुवातीला पोलिसांकडून याबाबत टाळाटाळ केली जात होती, मात्र महिलांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर मुंढवा पोलीस स्टेशनचे पुरुष पोलीस कर्मचारी करपे आणि गाडे त्याचबरोबर महिला कर्मचारी बनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमं ही कमी प्रभावी आहेत. ती पुरेशी नसून त्यांच्यावर 354 दाखल करून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात यावं अशी मागणी शिवसेना महिला आघाडीकडून करण्यात आली आहे.