बारामती : हायवेवर लूटमार करणारा सराईत गुन्हेगार सैराट जाधवला (Sairat Jadhav) ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आलं आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात महामार्गावर झालेल्या जबरी चोरीचा तपास करत असताना पोलिसांनी दोघांवर कारवाई केली. दोघा आरोपींना लातूरमध्ये जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले. (Pune Police arrests infamous Bullet Bike Thief Sairat Jadhav from Latur)
सराईत गुन्हेगार सैराट जाधव पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील महामार्गांवर वाटमारी तसेच लूटमार करत असे. सैराटसह त्याच्या एका साथीदाराला पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. दौंड तालुक्यात महामार्गावर झालेल्या एका जबरी चोरीचा तपास करत असताना कारवाई करण्यात आली.
पुण्याला येणाऱ्या बाईकस्वाराची लूट
दौंड तालुक्यातील रावणगाव येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 27 मार्च रोजी मध्यरात्री जबरी चोरीचा प्रकार घडला होता. पंढरपूर येथून दुचाकीवर पुण्याकडे निघालेल्या हेमंत करे यांच्या दुचाकीला दुसरी दुचाकी आडवी मारुन दोघांनी त्यांची दुचाकी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 67 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लातूरमधून ज्ञानेश्वर उर्फ सैराट बालाजी जाधव आणि अर्जुन उर्फ अजय बालाजी जाधव या दोघांना ताब्यात घेतले.
कल्याणमध्ये सख्खे भाऊ पक्के चोर
दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्यांच्याकडून 11 बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. यामध्ये नव्या कोऱ्या बुलेटचाही समावेश होता. या सर्व गाड्या विकण्याच्या तयारीत असताना त्यांचं बिंग फुटलं. या सख्ख्या भावांनी ठाणे जिल्ह्यात नाही तर नाशिकमध्ये चोऱ्या केल्या होत्या.
पिंपरीत बुलेट चोरणारे दोघे गजाआड
याआधी, बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. विशाल मगर, विशाल खैरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं होती. त्यांच्याकडून 13 बुलेट आणि दोन अन्य महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. हा सर्व मुद्देमाल 20 लाख 50 हजारांचा होता.
संबंधित बातम्या :
सख्खे भाऊ, एकत्र चोरीचा घाट, 11 दुचाकींसह दोघांना अटक
पिंपरी चिंचवडमध्ये बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना अटक, 13 बुलेटसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
(Pune Police arrests infamous Bullet Bike Thief Sairat Jadhav from Latur)