पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत आहे. आजसुद्धा पुणे गुन्हेगारांमुळे चर्चेत आलं पण त्यामध्ये फरक होता. कारण आज पोलिसांनी गुन्हेगारांमध्ये दहशत पसरवली, याचं कारण म्हणजे पुण्याचे नवीन आयुक्त अमितेश कुमार. आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यावर पुण्यातील 267 गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलं होतं.
गुन्हेगारांची ओळख परेड सुरू असताना मीडियालाही लाईव्ह करण्याची परवानगी देत पोलिसांनी गुन्हेगारांना तंबी दिली. याआधी फक्त ज्या गुन्हेगारांची नावं ऐकलीत टोळीच्या म्होरक्यांना सर्वांनी पाहिलं. यामध्ये गजा मारणे, बंडू आंदेकर, निलेश घायवळ, बाब बोडकेसह इतरही टोळीच्या म्होरक्यांना ओळख परेडसाठी पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलं होतं. पोलिसांनी सर्व गुन्हेगारांची ओळख परेड करत त्यांना तंबी दिली. यावेळी कुख्यात गुंड गजा मारणे याने पोलिसांसमोर हात जोडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
पाहा व्हिडीओ:-
पोलिसांनी सर्वांना बोलावत ओळख परेड केली त्यानंतर एकत्रितपणे सर्व टोळ्यांना काही सूचना केल्या. कोणत्याही गुन्ह्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी व्हायचं नाही. गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे व्हिडीओ हे शेअर नाही झाले पाहिजेत. या सूचनांचं पालन नाही झालं तर तडीपार, मोक्का अशी कारवाई केली जाणार आहे. पोलीस अधिकाऱ्याने सर्वांना या सूचना समजल्या का अशी विचारणा केली. त्यावेळी घायवळ, मारणे, पोटे यांची नावे घेतलीत.
दरम्यान, ज्यावेळी पोलीस अधिकाऱ्याने गजा मारणे यांचं नाव घेतल्यावर त्याने हात जोडल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस आता अॅक्शन मोडवर आले असल्याने आता पुण्याच्या गुन्हेगारीला आळा बसणार असं दिसत आहे. त्यामुळे सर्वसामन्यांनी सुटकेचा श्वास घेतला असावा.